२४ तासांत ३९.६९ किमीचा रस्ता बांधल्याची जागतिक स्तरावर घेतली दखल
पुणे : आशिया आफ्रिका बिझनेस अँड सोशल फोरमतर्फे पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉनचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम व संचालक यांचा ‘ग्रेटेस्ट ब्रँड अँड लीडर’ पुरस्काराने दुबईत सन्मान करण्यात आला. राजपथ इन्फ्राकॉनने साताऱ्यात २४ तासांत ३९.६९ किमीचा रस्ता बांधल्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आहे. दुबईतील बिझनेस मीडिया हाऊसमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत २०२०-२१ साठीचा ‘ग्रेटेस्ट ब्रँड अँड लीडर’ हा पुरस्कार कदम यांना श्रीलंकेचे राजदूत मालराज डिसिल्व्हा, संयुक्त अरब अमिरातीतील सामाजिक विकास मंत्रालयाच्या अमल अलब्लुशी, मोल्दोवा प्रजासत्ताकचे राजदूत व्हिक्टर हारुता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राजपथ इन्फ्राकॉनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मे महिन्यात साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान ३९.६९ किलोमीटरचा रस्ता २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित करत महाराष्ट्राच्या एकसष्टी निमित्त अनोख्या अनोख्या स्वरूपात अभिवादन केले होते. ‘राजपथ इन्फ्राकॉन’च्या विश्वविक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्येही झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर संशोधन, छाननीनंतर या पुरस्कारासाठी नामांकन केले जाते. आघाडीच्या ज्युरींकडून तावून सुलाखून निवड प्रक्रिया राबविण्यात येते.
या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत जगदीश कदम म्हणाले, “पायाभूत सुविधा क्षेत्रातील विकासासाठी काम करणारी एक संस्था म्हणून राजपथ इन्फ्राकॉनची ओळख आहे. करोना काळातील लॉकडाउनसह विविध अडचणी आणि आव्हानांचा सामना करून ‘राजपथ इन्फ्राकॉन’ने हा रस्ता तयार केला. आशिया, मध्य पूर्व आणि अफ्रिकेतील महान व्यक्तींसमवेत हा सन्मान झाला, याचा आनंद आहे. या निमित्ताने आशियाई, मध्य पूर्व आणि अफ्रिकन प्रदेशातील जागतिक दर्जाच्या आणि उद्योगातील सर्वोत्तम संस्थांच्या कामगिरीचेही दर्शन या परिषदेत घडले. उद्योग वाढ आणि शाश्वत विकासासाठी उद्योजकता, उत्कृष्ठता आणि सामुहिक चांगुलपणाची भावना अशा पुरस्कारांमुळे दृढ होते. भविष्यातही आणखी चांगले उपक्रम राबविण्याचा मानस आहे.”