पुणे : गेल्या दोन दशकांहून अधिक काळ जागतिक दर्जाचे सर्वांगीण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या हस्ते ‘बेस्ट एज्युकेशनिस्ट आयकॉनिक अवॉर्ड-२०२१’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या समारंभात वर्ल्ड बिझनेस रिव्ह्यू कॉर्पोरेशनच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘केजी टू पीजी’पर्यंतचे शिक्षण देत हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम सूर्यदत्ता शिक्षण संस्था १९९९ पासून करत आहे. देशाच्या विकासात योगदान देऊ शकणारी कौशल्याभिमुख आणि रोजगारक्षम पिढी घडत आहे. ‘सूर्यदत्ता’ने परंपरा आणि आधुनिकता याची सांगड घालत विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण दिले आहे. त्यासाठी सातत्याने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कार्यशाळा, प्रशिक्षण व प्रात्यक्षिक अनुभव देणारे उपक्रम राबविले जातात. गेल्या २२ वर्षांतील शैक्षणिक प्रगतीचा आलेख लक्षात घेऊन वर्ल्ड बिझनेस रिव्ह्यू कॉर्पोरेशनने संस्थेचे सर्जनशील, कल्पक आणि अभ्यासू नेतृत्व असलेल्या प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना सन्मानित केले आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षण देण्याची सूर्यदत्ताची परंपरा यापुढेही कायम राहील. येत्या काळात महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशभर विस्तार करण्याचा मानस आहे. डिजिटल माध्यमांमुळे जग जवळ आले असून, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी या माध्यमांचा प्रभावी वापर केला जात आहे. वैविध्यपूर्ण शाखांचे शिक्षण सूर्यदत्तामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”