उल्लेखनीय ‘सीएसआर’ कार्यासाठी सुदर्शन केमिकल्स  सलग दुसऱ्यांदा ‘इंडिया महात्मा अवार्ड’ने सन्मानित

उल्लेखनीय ‘सीएसआर’ कार्यासाठी सुदर्शन केमिकल्स सलग दुसऱ्यांदा ‘इंडिया महात्मा अवार्ड’ने सन्मानित

पुणे : सामाजिक बांधिलकी उपक्रमातील (सीएसआर) उल्लेखनीय कार्यासाठी सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सलग दुसऱ्यांदा ‘इंडिया महात्मा अवॉर्ड्स’ने सन्मानित करण्यात आले. सामाजिक शाश्वत विकासासाठी कार्यरत अमेरिकेतील लाईव्ह वीक ग्रुप या संस्थेमार्फत हे पुरस्कार दिले जातात. जगभरात समाजकार्यात महत्वपूर्ण व भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कामाची जागतिक स्तरावर ओळख व्हावी, यासाठी हा ‘इंडिया महात्मा पुरस्कार’ दिला जातो.
 
पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि लाईव्ह वीक ग्रुपचे अमित सचदेवा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुदर्शन केमिकल्सच्या पिपल प्रॅक्टिस विभागाच्या प्रमुख शिवालिका पाटील आणि ‘सीएसआर’ विभागाच्या उप सरव्यवस्थापक माधुरी सणस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भारतातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे (सीएसआर) जनक, उद्योजक आणि समाजसेवक अमित सचदेव यांनी महात्मा पुरस्कार सुरु केलेला आहे.
शिवालिका पाटील म्हणाल्या, “जागतिक स्तरावरील या पुरस्काराने सन्मानित होण्याचा मान सुदर्शन केमिकल्सला दुसऱ्यांदा मिळाला, याचा आनंद व अभिमान वाटतो. व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास क्षेत्रात ‘सुदर्शन’ने भरीव काम केले आहे. वृक्षलागवड, संगोपन, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्य प्रशिक्षण, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय केंद्र उभारणी, शिवणकाम प्रशिक्षण व शिलाई मशीन वाटप, कागदी पिशवी प्रकल्प राबविण्यासह बस स्टॉप, निवारा आदी सोयी उपलब्ध केल्या आहेत. “
 
“कोरोनाच्या काळात सुदर्शन केमिकल्सने केलेले कार्य उल्लेखनीय होते. वैद्यकीय, जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा सुदर्शन केमिकल्सने केला. शिवाय, कर्मचाऱ्यांच्या आणि रोहवासीयांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन व लसीकरण शिबिरे घेतली. शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, यासाठी गावांमध्ये एक्वा प्लांट, विहीर बांधकाम यासह गाव, शाळांमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे,” असे माधुरी सणस म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *