अपघातमुक्त महामार्ग द्या; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

अपघातमुक्त महामार्ग द्या; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

‘मनसे’च्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांचा इशारा

पुणे : खड्ड्यां चे साम्राज्य, खचलेला रस्ता, बोगद्यातील बंद दिवे यामुळे पुणे-सातारा महामार्ग अपघाताचे केंद्र बनला आहे. या महामार्गावरील बहुतांशी कामे रखडलेली असून, सेवा रस्तेही अत्यंत खराब आहेत. येत्या आठ दिवसांत या महामार्गाची शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करावी आणि अपघातमुक्त महामार्ग उपलब्ध करून द्यावा, अन्यथा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करू,” असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांनी दिला.

जगदीश वाल्हेकर म्हणाले, “महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचला आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे व रस्ता खचल्यामुळे भीषण अपघात होत आहेत. शिवाय, नवीन कात्रज बोगद्यातील दोन्ही बाजूच्या लाईट बंद असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. पथकर आकारलेला महामार्ग वाहतुकीसाठी योग्य असावा, असे न्यायालयाने स्पष्ट केलेले असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआयए) व रिलायन्स केवळ टोलवसुली करण्यात गुंग आहे. चारपदरी महामार्ग असताना सहापदरीचा टोल वसूल केला जात आहे. तरीही महामार्गाच्या देखभाल व दुरुस्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. यासंबंधीचे निवेदन अनेकदा दिलेले आहे. मात्र, त्यावर योग्य ती कारवाई होत नाही.”

“या महामार्गावरील खड्डे व खचलेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, बोगद्यातील दिवे लावावेत आणि अपघातमुक्त महामार्गासाठी उपाययोजना कराव्यात. पुढील आठ दिवसात याबाबत कार्यवाही झाली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन मनसे स्टाईलने केले जाईल. त्यानंतर होणाऱ्या नुकसानिस एनएचआयए आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर जबाबदार राहील. आमची भूमिका सहकार्याची आहे; पण जनतेला होणारा त्रास थांबला पाहिजे,” असेही वाल्हेकर यांनी सांगितले.

नितीन गडकरी, अजित पवारांनाही निवेदन
दरम्यान, पुणे सातारा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेकदा हे खड्डे जीवावर बेतत आहेत. त्यामुळे यासंदर्भात लक्ष घालून ‘एनएचआयए’ व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला चांगला महामार्ग देण्याच्या सूचना कराव्यात, अशी विनंती वाल्हेकर यांनी निवेदनाद्वारे गडकरी व पवार यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *