पुणे : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात अनेक गावांचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुरग्रस्तांच्या उभारणीत त्यांच्या पाठीशी आपल्या परीने उभे राहण्यासाठी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाने कोंडिवते गावातील पुरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि शाळेस संगणक संचाचे वितरण केले. तसेच पुढील मदतीसाठी जवळपासच्या गावांची पाहणी केली.
यावेळी समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाचे खजिनदार गणेश काळे, माजी विद्यार्थी निसार चौगुले, सोपान गोंटला, लक्ष्मण जाधव, गणेश ननवरे, कोंडिवते ग्रामपंचायतचे सरपंच सुनिल डावरुंग, शाळेचे मुख्याध्यापक गौतम वानखेडे, पोलीस पाटील धोंडीराम डिगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अध्यक्ष महेंद्र डिगे, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शिंदे उपस्थित होते. मंडळाचे सल्लागार ऍड देविदास टिळे यांनी नियोजन केले.
आम्हाला अन्नधान्य मिळाले होते, मात्र शैक्षणिक साहित्याची उणीव होती ती आता लाभली आहे. मंडळाच्या या दातृत्वाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, अशी भावना कोंडिवते ग्रामस्थांनी व्यक्त केली. या भागातील विद्यार्थ्यांना व लोकांना आणखी भरीव मदत करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.