स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी गोहत्या बंदी कायदा लागू करण्याची घोषणा करावी

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी गोहत्या बंदी कायदा लागू करण्याची घोषणा करावी

सर्वजीव मंगल प्रतिष्ठानतर्फे डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी

पुणे : पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून अभिभाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गोहत्या बंदी कायदा लागू करण्याची घोषणा करावी, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह २० हजार नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांना ईमेल, पत्र आणि संदेशाद्वारे हे निवेदन पाठवले आहे.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “देशाच्या प्रगतीसाठी आणि प्रतिमेसाठी पंतप्रधान म्हणून मोदी करत असलेल्या कार्याचा आपल्या सर्वानाच सार्थ अभिमान आहे. मोदी हे लहानपासूनच गोरक्षक आहेत. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी यंदा १५ ऑगस्ट रोजी लाल किल्यावरुन अभिभाषण करताना संपूर्ण हिंदुस्थानमध्ये गोहत्येवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा करावी. याच लाल किल्यावर सन १८८३ साली हिंदू समाजाचे सरसेनापती महादजी शिंदे यांनी पूर्ण गोवंश हत्या बंदी घालण्याची घोषणा केली होती. तसेच २००८ साली सर्वोच्च न्यायालयाने गोवंश हत्या बंदीचा निर्णय दिला होता. हा निर्णय अंमलात आणायला हवा.”

प्रत्यक्षात आपल्या देशात भारतीय गाईंना मानवाच्या आरोग्यासाठी तसेच शेतीसाठी अनन्यसाधारण महत्व आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी गोवंश अस्तित्व खूप आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून गोवंश रक्षणाची घोषणा करून भारताच्या इतिहासात नोंद करावी. हिंदुस्थानातील असंख्य नागरिकांकडून गोवंश रक्षणाची मागणी होत आहे. पुण्यातील वडगाव शेरी येथे चातुर्मास करत असलेल्या प्रीतिसुधाजी महाराज आणि मधुस्मिताजी महाराज यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही डॉ. कल्याण गंगवाल यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *