चंद्रकांत दळवी यांचे मत; आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप
काळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत’, रोकडे यांना ‘कर्मयोद्धा’ पुरस्कार प्रदान
पुणे : “आपल्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून समाजासाठी उत्तम काम करत राहिलो, तर समाज त्याची दखल घेतो. शिक्षकांवर समाज घडवण्याची मोठी जबाबदारी असते. त्यांनी मनापासून ती जबाबदारी जोपासावी. कारण शिक्षकांच्या सेवाव्रती शिकवणीतूनच समाज घडतो,” असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपात दळवी बोलत होते. प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अशोक पगारिया, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण आंधळे, विद्यार्थी प्रतिनिधी रविराज काळे उपस्थित होते.
प्रसंगी दळवी यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रीती काळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार, तर बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रशांत रोकडे यांना कर्मयोद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गजानन वाव्हळ, अनिल जायभाय, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. संजय नगरकर आणि विकास रानवडे यांना साने गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चंद्रकांत दळवी म्हणाले, “रतय शिक्षण संस्थेने स्वावलंबनाची बीजे कित्येकांच्या मनामध्ये खोलवर रूजवली आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाच्या कक्षा अधिकाधिक विस्तारीत होण्यासाठी आपण सर्वानी कटिबद्ध राहिले पाहिजे. ग्रामविकासाची संकल्पना विचारापुरती मर्यादित न राहाता वास्तवात उतरली, तर खेडी अधिक प्रगत होतील. ऑलिंपिक खेळात ग्रामीण भागातील मुलांचा सहभाग वाढण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव द्यावा. तसेच त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उभारायला हव्यात.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “स्वप्ने पाहून त्याच्या पूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. महात्मा फुले यांच्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अगदी चंद्रकांत दळवी यांच्यासारखी आदर्श उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जीवनात प्रामाणिक काम करत राहावे. बंधुतेचा धागा जपत माणसे जोडण्याचे काम करावे.”
डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “बंधुतेचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे. गेल्या दोन वर्षात बंधुतेचे, मानवतेचे दर्शन घडले. साहित्याच्या माध्यमातून बंधुतेचा प्रसार प्रभावीपणे झाला, तर विश्वात बंधुभावाचे, प्रेमाचे वातावरण तयार होईल.” प्रीती काळे, प्रशांत रोकडे यांनीही सत्काराला उत्तर दिले. सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. आभार रविराज काळे यांनी मानले.