पुणे : अमेरिकेतील ग्लोबल चेंबर या जागतिक स्तरावरील संस्थेच्या सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी पुण्यातील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची नियुक्ती झाली आहे. जगभरातील 525 शहरी विभागांत विस्तारलेल्या या संस्थेत उच्च पदस्थ, सीईओ आणि नेतृत्व करणार्या मान्यवरांचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचा मोठा अनुभव, सखोल ज्ञान आणि समाजाभिमुख काम करण्याची त्यांची वृत्ती लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. सुर्यदत्ता परिवारासाठी ही अभिमानाची बाब आहे.
उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे. उद्योग, गुंतवणूकदार आणि उद्योगांना सेवा पुरविणारा वर्ग यांना ही संस्था सहकार्य करते. डौग ब्रुहन्के या संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 2014 मध्ये स्थापन झालेल्या ग्लोबल चेंबरचे मुख्य कार्यालय अमेरिकेत असून, याचे चॅप्टर्स पाच खंडातील 195 देशांत 525 पेक्षा जास्त शहरांमध्ये आहेत. सुर्यदत्ता ग्रुपही या संस्थेचा सदस्य आहे. सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ग्लोबल चेंबरचे सदस्य बनल्यानंतर महिनाभरात प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची ग्लोबल चेंबर अहमदाबाद चॅप्टरच्या सल्लागार मंडळ सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
या सल्लागार मंडळाचे कार्यकारी संचालक शंकर दामोदरन असून, अन्य सदस्यांमध्ये व्हायब्रंट मार्केट्स इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जगत शहा, गेसिया आयटी असोसिएशनचे महासंचालक अनुपम भटनागर, आयआरएम प्रा. लिमिटेडमधील एव्हिएशनचे मुख्य व्यावसायिक अधिकारी डॉ. अरुण लोहिया, एसव्ही इनोव्हेशन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाविन पंड्या, द सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशीप डेव्हलपमेंट गुजरातचे माजी संचालक डॉ. चंदन चटर्जी, युएस इंडिया इन्व्हेस्टर्स फोरमचे चेअरमन मनोज गुरसहानी, एफसीसीआय गुजरातचे प्रमुख पंकज तिबक यांचा समावेश आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “जागतिक स्तरावरील कार्य, विश्वासार्हता आणि उद्दिष्ट्ये याचे मुल्यांकन होऊन संस्था किंवा कंपन्यांना ग्लोबल चेंबरचे सदस्यत्व मिळते. या सदस्यत्वामुळे सुर्यदत्तातील विद्यार्थ्यांना भारतातील, तसेच परदेशातील कंपन्यांनी जोडून घेण्याची संधी मिळणार आहे. त्यातून व्यवसाय प्रकल्प, विद्यार्थ्यांचे प्रकल्प, इंटर्नशीप आणि इतर गोष्टींसाठी हे सदस्यत्व उपयुक्त ठरणार आहे. ग्लोबल चेंबर सल्लागार मंडळातील सदस्य हे उत्तम व्यावसायिक नेतृत्व विकसित करण्यासह कंपन्यांना प्रगतीसाठी मदत करतात. यामुळे अनेक प्रकारच्या संधी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो.”
सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापणार
ग्लोबल चेंबरशी भागीदारी असलेल्या मायफिनबी या सिंगापूरस्थित आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या सहकार्याने ‘सुर्यदत्ता’मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन्यात येणार आहे. या सेंटरमार्फत डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सल्ला व मार्गदर्शन पुरविले जाईल. याचा उपयोग विद्यार्थी वर्गाला, तसेच समाजाला मोठ्या स्वरुपात होईल, असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
‘सीईजीआर’वरही नियुक्ती
काही दिवसांपूर्वीच प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेली नवी दिल्ली येथील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अॅन्ड रिसर्च (सीईजीआर) या संस्थेच्या वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ‘सीईजीआर’मध्ये नामवंत विद्यापीठांचे कुलगुरु, शिक्षण संस्थांचे संचालक व तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे.