परिसस्पर्शाचा संस्मरणीय सहवास
‘बेटा, एक काम कर, तू या गोगावलेला वसतिगृह सांभाळण्यात मदत कर आणि इथंच राहा. काही लागलं तर मला येऊन भेटत जा’ या वाक्यापासून सुरु झालेला प्रवास ’अहो अरुण खोरे, हा माझा विद्यार्थी आहे. आमच्या शाळेचा, वसतीगृहाचा विद्यार्थी आहे. त्याला मी चांगलं ओळखतो. तो चांगला लिहितो. त्याला आपल्या संस्थेची दारं कायमच खुली आहेत’ या विश्वासानं दृढ झालेला स्नेहबंध! आणि ‘तु जे करशील, ते चांगलं करशील. काळजी घे तुझी आणि घरच्यांची. लॉकडाऊन संपलं की, भेटू संस्थेत.’ या संभाषणानंतर थांबलेला प्रवास.
– जीवराज चोले, संचालक, उचित माध्यम, पुणे.
डॉ. विकास आबनावे नव्हे; माझा आणि माझ्यासारख्या असंख्यांचा आधारवड हरपला. बघता बघता डॉक्टरांना जाऊन एक वर्ष होत आलं. त्यांचा 16 जुलैला पहिला स्मृतीदिन होतोय. पण मन आणि नजर अजूनही संस्थेच्या कार्यालयातील त्या लांबड्या टेबलच्या एका मोठ्या खुर्चीवर बसून डॉक्टर आपल्याशी गप्पा मारताहेत, याकडेच आहे. पहिल्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं प्रकाशित होऊ घातलेल्या स्मृतीग्रंथात लिहिताना आज पुन्हा एकदा मन सुन्न झालंय. वेदनांचा, आठवणींचा हलकल्लोळ उठलाय. डोळे पाणावलेत. उर दाटून आलाय. असंख्य प्रसंग डोळ्यासमोर पुन्हा-पुन्हा तरळून जाताहेत.
2020-21 वर्षानं अनेक जवळची, वडीलधारी, आपली हक्काची माणसं हिरावली. डॉ. विकास आबनावे अचानक गेले. एखाद्या योद्ध्याप्रमाणं कोरोनाच्या लढ्यात लढणारे डॉक्टर कोरोनाच्या संसर्गानं जावेत, हे दुर्दैवी होतं. पंधरा एक दिवसांपूर्वीच डॉक्टर, मोहनदादा आणि अन्य काही लोक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. अविनाश भोंडवे व अन्य पदाधिकार्यांशी बैठक होती. डॉक्टरांचा मला त्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी फोन आलेला. समाजात याबाबत जागृती व्हावी, यासाठी याची बातमी व्हायला हवी, असा त्यांचा निरोप होता. माझं आणि डॉक्टरांचं ते अखेरचं बोलणं ठरलं.
त्या फोननंतर चार-पाच दिवसांनी मला गावी जावं लागलं. गावी आल्यानं नेटवर्क प्रॉब्लेम होता. आठच्या सुमारास अशोक विद्यालयातील माझी मैत्रीण नीलम कांबळेचा मेसेज आला, तुला आबनावे सरांबद्दल समजलं का? तो वाचण्यापूर्वी मीडियातील चारपाच जणांचे फोन येऊन गेले होते. महाराष्ट्र टाईम्सचा हर्ष, प्रभातचा व्यंकटेश भोळा यांचाही मेसेज होता. तेवढ्यात अरुण खोरे सरांचाही फोन आला. काळजात धस्स झालं. संशय बळावला. फोन उचलला आणि नको ते ऐकावं लागलं. ’अरे जीवराज दुःखद घटना घडलीरे, आबनावे सर गेले’ खोरे सर म्हणाले. आणि मग सरांबरोबरचे सर्व क्षण आठवू लागले. महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव, हरिजन सेवक संघाचे, काँग्रेसचे निष्ठावान नेते, प्रसिद्ध वक्ते, उत्तम प्रशासक, सखोल ज्ञानी, ज्ञानदानाच्या प्रवाहातील वाहता ही आणि आणखी बरीच त्यांची ओळख.
पण माझ्यासाठी त्यापलिकडची ओळख होती. एक नातं होतं, ते म्हणजे पालकाचं. गुरू-शिष्याचं. प्रत्येक भेटीत आत्मज्ञान देणारा हा गुरू असा अचानक आपल्यातून जातो, हेच मनाला न पटणारं होतं. इतरांना सतत काळजी घ्या, आरोग्य जपा, आयुष्य फार सुंदर आहे, असं सांगत सकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनणारा मार्गदर्शक आपल्यात नाही, यापेक्षा वेदनादायी बाब नाही. डॉक्टरांबरोबर असंख्य आठवणी आहेत. ते जेव्हा कक्षात बसलेल्या लोकांना अभिमानानं सांगत ’हा आमचा विद्यार्थी. तो वसतिगृहात राहून शिकला. आज चांगलं काम करतोय.’ तेव्हा माझी मान आणखीनच ताठ व्हायची. त्यातून प्रेरणा मिळायची. आणखी जोमानं काम करण्याची ऊर्जा मिळायची.
2005 मध्ये अकरावीला अशोक विद्यालयात प्रवेश घेतला. पण राहण्याखाण्याची अडचण होती. तेव्हा बापू आबनावे यांना मला इथं राहू देण्याची विनंती केली. मात्र, बापू म्हणाले, ’हे वसतिगृह समाजकल्याणचं आहे आणि ते दहावीपर्यंत आहे; तेव्हा तुला राहता यायचं नाही.’ निराश होऊन बाहेर पडत होतो, तेवढ्यात डॉ. संस्थेच्या गेटमधून आत येत होते. त्यांना भेटून परिस्थिती सांगितल्यानंतर ’बाळ, तू ये आपण बघू’ म्हणत पुन्हा आत घेऊन आले. ’बेटा, एक काम कर तू या गोगावलेला वसतिगृह सांभाळण्यात मदत कर आणि इथं राहा’ असं सांगत जिन्याखालची खोली दाखवली. तिथं जिन्याखाली राहणं आणि जिन्याच्या वर कॉलेज करणं असा दिनक्रम सुरू झाला. तेव्हा काँग्रेसच्या दर शनिवारी बैठका होत असत. त्या बैठकीच्या चहापानाची व्यवस्था करण्याची जबाबदारीही डॉक्टरांनी माझ्यावर दिलेली होती. त्यामुळं दोन वर्षाच्या या काळात त्यांच्याशी अधिकच गट्टी जमली होती. बारावीला असताना ’मिळून सार्याजणी’च्या निबंध स्पर्धेत राज्यात दुसरा आल्याचं समाजल्यानंतर डॉक्टरांनी ऑफिसमध्ये बोलावून मोहन जोशी (दादा) यांच्या हस्ते माझा सत्कार केला. एक पुस्तक भेट दिलं. मला म्हणाले, ’असंच चांगलं लिहीत राहा, तुला कोणताही रेफरन्स लागला तर बिनधास्त ये, मी सांगेन’
पुढं बीसीएसला असताना थोडा संपर्क कमी झाला. मात्र, त्याच रस्त्यानं कॉलेजला जात असल्यानं अधूनमधून भेट व्हायची. तीन वर्षात चारपाच निबंध स्पर्धात मिळालेलं यश ऐकून त्यांना फार आनंद झालेला. शेवटी मी पत्रकारिता करतोय सांगितलं तर, ’मला भेटत राहा’ असं म्हणलेले. केसरी, सकाळमध्ये काम करत असताना अधुनमधुन मी अशोक विद्यालयात जाऊन सर्वाना भेटून येत असे. गेल्यावर लगेच ’अरे, ये ये, बैस कसा आहेस तू? सगळं ठीक ना?’ अशा आपुलकीच्या प्रश्नानं स्वागत व्हायचं. 2014 च्या अखेरीस मी एमआयटीला जॉईन झालो. तेव्हा अरुण खोरे सरांशी माझा जवळून संपर्क आलेला. एकदा खोरे सरांसोबत डॉक्टरांकडे गेलो होतो. खोरे सरांनी ’विकास, हा अगदी चांगला मुलगाय, एमआयटीच्या प्रसिद्धीचं काम बघतो. आपल्याला काही मदत लागली तर याला सांगत जाऊया’ असं सांगत ओळख करून दिली. त्यावर स्मितहास्य करीत डॉक्टर म्हणाले, ’अहो खोरे, हा माझा विद्यार्थी आहे. आमच्या शाळेचा, वसतीगृहाचा विद्यार्थी आहे. त्याला मी ओळखतो. चांगला लिहितो. त्याला आपल्या संस्थेची दारं कायमच खुली आहेत.’ तिथून पुढं भेटी वाढल्या. डॉक्टरांचं, संस्थेचं प्रसिद्धीचं काम हळूहळू पाहू लागलो.
पुढं 2017 पासून संस्थेचं सगळं काम ‘उचित’कडं आलं. मग प्रथमेश, पुष्कर, प्रसाद काका, गौरव, शीतल, विभा, कल्याणी या नव्या पिढीतल्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. ’उचित’चं ऑफिस अशोक विद्यालयाच्या जवळ असल्यानं चहासाठी भेटी वाढल्या. सर अनेकांना अभिमानानं सांगत ’हा माझा विद्यार्थी आहे, तो करेल ते चांगलं करेल’ तेव्हा मनातील नकारात्मक भावना जाऊन जोमानं काम करण्याची उर्जा मिळत असे. 2016 पासून ‘संवाद…सर्जनशील मनांशी’ हा दिवाळी अंक करायला सुरुवात केली. तेव्हा लेख आणि जाहिरात घेण्यासाठी डॉक्टरांना बोललो. ‘तुला हव्या त्या विषयावर कायमस्वरुपी लेख आणि जाहिरात मिळेल. पण हा अंक स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मेहनत घे. चांगला विषय आहे,’ असं सांगत जाहिरात आणि लेख दोन्ही दिले. पुढं चारही अंकात डॉक्टरांचा माहितीपूर्ण लेख आणि जाहिरात ठरलेली असे. डॉक्टर माझ्या ’संवाद… सर्जनशील मनाशी’ विज्ञान विशेषांकाचे लेखक-मार्गदर्शक आणि प्रसंगी पाठबळही!
पत्रकारितेतलं, जनसंपर्क क्षेत्रातलं माझं काम पाहून डॉक्टर एक दिवस म्हणाले, ’अरे जीवराज, तुला विथ फॅमिली दिल्लीला यायचंय. तुला बाबू जगजीवनराम संस्थेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार द्यायचाय. लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते.’ म्हणालो, ’सर दिल्लीला विथ फॅमिली येण्याइतकं बजेट नाही.’ ’तू येरे, राहण्याची सोय करतो, दोन दिवस फिरा, एन्जॉय करा, पुरस्कार, कौतुक घ्या. सारखं काम काम करू नको’ असं त्यांनी सुनावलं. दिल्लीला गेलो, पहाडगंजला एका हॉटेलात रूम बुक केलेली होती. आम्ही राहिलो. पुरस्कार घेतला. मीराकुमार असल्या, तरी फोटोवेळी का होईना डॉक्टर स्टेजवर हवेत; असा आग्रह केल्यानं डॉक्टर आले. फोटो घेतला. रूमवर आलोत. दिल्लीत काही ठिकाणं पाहिली. निघताना डॉक्टरांचा फोन ’तुला शक्य तितकं बिल दे. बाकी मी पाहून घेईन.’
डॉक्टरांना भेटलं की वैश्विक सफर व्हायची. अर्ध्या पाऊण तासांच्या गप्पांत गल्लीतील राजकारणापासून तर वैश्विक स्तरावरील चालू प्रश्नांपर्यंत चर्चा झाडायची. ज्ञानात भर पडायची. गेल्या वर्षभरापासून हे सगळं मिस होतय. आता संस्थेत डॉक्टरांचा वावर, आवाज ऐकू येतो, तो केवळ आठवणींतूनच. पुण्यातल्या साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमात डॉक्टर दिसत नाहीत. हक्कानं शेजारच्या खुर्चीवर बसवून चहा आग्रहानं चहा पाजत नाहीत. पण डॉक्टर सोबत आहेत. पाठिशी आहेत. त्यांनी मला अनेक संस्थांशी, व्यक्तिंशी जोडून दिले. आजही त्यांचे काम सुरु आहे. त्यातून डॉक्टर भेटत राहातात. मग त्या त्यांच्या शिष्या सुमीता सातारकर असोत, की राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे प्रकाश रोकडे असोत.
या सगळ्या आठवणींचा धांडोळा घेताना मला डॉक्टर भावले ते असे की, डॉ. विकास आबनावे एक चतुरस्त्र, अष्टांंगवधानी वक्ते, मार्गदर्शक आणि लेखक. जवळपास तीन दशके जगभर मुशाफिरी करत, विविध विषयांवर सखोल ज्ञान व पुराव्यांसहित विचार मांडणारा विचारवंत. कोणताही विषय वर्ज्य न ठेवता शिक्षण, समाजकारण, राजकारण, कला-संस्कृती, महिला सक्षमीकरण, अध्यात्म, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध पर्यटनस्थळे अशा सगळ्याच विषयांवर मनसोक्त, दिलखुलास आणि स्पष्ट व परखड भाष्य करण्याचा त्यांचा स्वभाव! त्यांच्याशी गप्पा मारताना, चर्चा करताना आपण समृद्ध होऊन जातो, हे नंतर लक्षात यायचे. नवकल्पनांचे भांडार असलेल्या डॉक्टरांकडे प्रत्येक प्रश्नावर उत्तर असायचे. आपण एखादी कल्पना सांगितली, तर ती प्रत्यक्षात येण्यासाठी किंवा मूर्त स्वरुप देण्यासाठीचे पर्याय सुचवायचे. थोडक्यात काय तर, डॉ. आबनावे हे एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे होते. त्यांच्याकडे जावे आणि आपल्याला रिकाम्या हाताने, रिकाम्या मनाने परत यावे लागेल, असे मला तरी कधीच अनुभवायला मिळाले नाही.
त्यांचा हाच जिव्हाळा, मार्गदर्शन, प्रेरणा घेऊन अखंड कार्यरत राहण्याचा मानस आहे. डॉक्टरांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांनी आपल्याला दिलेल्या संस्काराप्रती, मान-सन्मानाप्रती कृतज्ञ राहताना जेजे शक्य तेते करण्याचा प्रयत्न पुढील काळात होत राहील. त्यांच्या आठवणी कायम मनात ठेवत त्यातून नवकल्पनांना जन्म देत, मूर्त स्वरुप देत, आपली प्रगती करत राहणं, जिथे माझी गरज असेल, तेथे संस्थेच्या हितासाठी क्रयशील राहणे, हीच माझी डॉक्टरांना खरी श्रद्धांजली असेल.