Post Views: 584





पानवडी गावात वन लेस, फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशन,
वन लेस व सायन्स टेक्नॉलॉजी पार्क लावणार ५० हजार फळझाडे
पुणे : वन लेस, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स टेक्नॉलॉजी पार्क या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात वृक्षारोपण करण्यात आले. पुढील तीन वर्षात या गावात ५० हजार फळझाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ मंगळवारी झाला. यावेळी आंबा, फणस, सीताफळ, आवळा, पेरू आदी ५०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या मनुष्यबळ विभागाचे अध्यक्ष राज लुईस, डॉ. प्रशांत वार्के, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, सायन्स टेक्नॉलॉजी पार्कमधील पूजा कंवर, आरती सूद, प्रकल्प समन्वयक वैभव निमगिरे, सन्मती शेडगार, सरपंच आबासाहेब लोळे, उपसरपंच माउली भिसे, माजी सरपंच सुषमा भिसे, ग्रामसेवक सुनीता सपकाळ आणि ग्रामस्त उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले, “पानवडी गावात फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन आणि सायन्स टेक्नॉलॉजी पार्क यांच्या प्रयत्नातून अनेक उपक्रम सुरु आहेत. या मध्ये “वन लेस” या नवीन समूहाचा समावेश आज होतो आहे या विशेष आनंद आहे. येथील डोंगर परिसरात आगामी काळात ५० हजार फळझाडे लावण्याचा, तसेच भविष्यात फळप्रक्रिया उद्योग उभारून येथील नागरिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. शास्त्रीय मार्गदर्शन व तांत्रिक साहाय्य पुरविले जात आहे. या झाडांचे संगोपन येथील शेतकरी करणार आहेत. अनेकांनी वृक्षारोपणासाठी जागा दिली आहे. निसर्ग संवर्धनासाठी गावकऱ्यांचा पुढाकार प्रेरक आहे.”
राज लुईस म्हणाले, “पर्यावरण संवर्धनासाठी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन नेहमीच अग्रेसर आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, स्वच्छ भारत आदी क्षेत्रात लायन्स क्लबने उल्लेखनीय कार्य केले आहे.” या वृक्षारोपण अभियानामुळे पानवडी गाव हिरवेगार होणारच आहे, शिवाय भविष्यात फळांचाही गोडावा चाखायला मिळणार आहे. सर्व गावकरी या झाडांचे संगोपन करणार आहोत, असे आबासाहेब लोळे यांनी सांगितले.
