पुणे : “वाढते शहरीकरण, विकासकामांच्या नावाखाली होणारी वृक्षतोड, काँक्रीटीकरण आणि टेकड्यांचा ऱ्हास तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहे. ही तापमानवाढ रोखायची असेल आणि भावी पिढीला मोकळी हवा घेऊ द्यायची असेल, तर निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवे. ‘एक कुटुंब एक झाड’ उपक्रम सर्वव्यापी झाला तर हे शक्य होईल,” असे मत राज्यसभा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ यांच्या वतीने आयोजित पर्यावरण सप्ताहाच्या समारोपावेळी चव्हाण बोलत होत्या. ‘जागतिक तापमानवाढ रोखण्यात नागरिक व स्वयंसेवी संस्थांची भूमिका’ या विषयावर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी ‘लायन्स’चे प्रांतपाल सीए अभय शास्त्री, पर्यावरण सप्ताहाचे समन्वयक अनिल मंद्रुपकर आदी उपस्थित होते.
या पर्यावरण सप्ताहामध्ये ‘नो व्हेईकल डे’, बत्ती गुल (एक तास दिवे बंद करून वीजबचत), प्रभाकर तावरे पाटील यांचे टेरेस गार्डनवर मार्गदर्शन, शामलाताई देसाई यांचे कचरा व्यवस्थापनावर मार्गदर्शन, भोर येथे वृक्षारोपण, गोशाळा पाहणी व मदत, कचरा संकलन, विजेची बचतवर मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. सप्ताहाच्या आयोजनात लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स, लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम, लायन्स क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर, लायन्स क्लब ऑफ पुणे विस्डम, लायन्स क्लब ऑफ पुणे प्रभात, लायन्स क्लब ऑफ नाशिक पंचवटी, लायन्स क्लब ऑफ पुणे नवचैतन्य, लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरूड आदी क्लब यामध्ये सहभागी झाले होते.
सीए अभय शास्त्री म्हणाले, “जगभर लायन्स क्लबचे जाळे आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. अनिल मंद्रुपकर व सहकाऱ्यांच्या माध्यमातून पर्यावरण सप्ताहाचे आयोजन झाले. विविध विषयांवर जागृती झाली आहे. आगामी काळात लायन्स क्लबकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाईल.” अनिल मंद्रुपकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. मयूर बागुल यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र टिळेकर यांनी आभार मानले.


 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                