कृष्ण प्रकाश यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्ता’तर्फे डॉ. पी. डी. पाटील यांना पहिला ‘सूर्यदत्ता सेवा-रत्न राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ प्रदान
पुणे : “शांत, संयमी पण दूरदृष्टी आणि सामाजिक जाणीव असलेल्या डॉ. पी. डी. पाटील यांचे निःस्वार्थ, सेवाभावी वृत्तीने केलेले कार्य समाजासाठी आदर्शवत आहे. शिक्षण, साहित्य, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.
सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे सूर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत उल्लेखनीय वैद्यकीय व सामाजिक सेवेबद्दल डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना ‘सुर्यदत्ता सेवा-रत्न राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. पी. डी. पाटील यांच्या नावाने पारितोषिक देण्याची घोषणाही ‘सूर्यदत्ता’च्या वतीने यावेळी करण्यात आली. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील विविध वैद्यकीय शाखेत अंतिम वर्षात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पदवी प्रदान समारंभाच्या दिवशी ११ हजार रुपये रोख व सुवर्णपदक असे पारितोषिक दिले जाणार आहे.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील सभागृहात झालेल्या या छोटेखानी सोहळ्यास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त संचालक डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सल्लागार सचिन इटकर, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. मिलीना राजे आदी उपस्थित होते. कोरोना विषयक नियमांचे पालन करत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील कुलगुरू, कुलसचिव, अधिष्ठाता यासह मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. तसेच फेसबुक व युट्युबवरून हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रसारित करण्यात आला.
कृष्ण प्रकाश म्हणाले, “सध्याच्या कोरोना काळात पी. डी. पाटील यांच्यासह त्यांच्या टीमकडून होत असलेले कार्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून उभारलेले शैक्षणिक कार्य एखाद्या परिसासारखे आहे. प्रत्येक कामातील त्यांची जिद्द, कठोर परिश्रम, इच्छाशक्ती, समर्पित भाव प्रभावित करणारा आहे. अशा महान सेवावृत्तीचा सूर्यदत्ता परिवार आणि डॉ. संजय चोरडिया यांनी सन्मान करून कृतज्ञताच व्यक्त केली आहे. ‘सूर्यदत्ता’चाही यामुळे सन्मान वाढला आहे. डॉ. डी. वाय. पाटील, सूर्यदत्ता यांसारख्या संस्था चांगले भरीव काम करत आहेत.”
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटात आमचे सर्व डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे हजारो रुग्णांवर चांगले उपचार करता आले, याचे समाधान आहे. अत्याधुनिक आरोग्य सुविधा आमच्या सर्वच रुग्णालयात उपलब्ध आहेत. राज्याच्या विविध भागातून, विविध सामाजिक स्तरातील रुग्ण येथे उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना आरोग्यासह भोजन, स्वच्छता, सकारात्मक राहण्यासाठी मार्गदर्शन अशा अनेक गोष्टी पुरविल्या जातात. हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर आमच्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आणि संस्थेचा आहे.”
“परमेश्वराच्या आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कृपेने या कठीण काळात सातत्याने आमचे सर्व डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी देवदूतासारखे काम करत आहेत. २००६ साली हॉस्पिटल उभारणी केल्याने आज त्याचा उपयोग झाला. चांगले काम करण्यासाठी मनाची प्रेरणा, अनेकांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो. स्वतःला वाहून घेऊन काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मला अभिमान वाटतो. कोरोनाचे संकट भयंकर असून, आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन लढा द्यायचा आहे,” असेही डॉ. पी. डी. पाटील यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “डॉ. पी. डी. पाटील यांनी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात योगदान देत देश-विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वैद्यकीय ज्ञान दिले आहे. तसेच या वर्षभरात कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व गरजू लोकांना निस्वार्थी, तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याचा त्यांचा पुढाकार महत्वपूर्ण आहे. असेच कार्य इतर अनेक व्यक्ती, संस्था व खासगी-सरकारी रुग्णालये करत आहेत. अशा कठीण काळात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित केले जाणार आहे. यंदाचा पहिला पुरस्कार डॉ. पी. डी. पाटील यांना सन्मान करताना आनंद वाटतो.”
सचिन इटकर यांनी आभार मानले. डॉ. पी. डी. पाटील यांचे सेवाभावी कार्याबद्दल आभार न मनात या कार्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त कार्याला हवी. आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात ‘पीडी’ हा ब्रँड झाला असून, त्यांच्यातील कामाप्रतीची समर्पित वृत्ती, जिद्द आणि इच्छाशक्ती आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे, असे इटकर यांनी नमुद केले. सायली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एन. जे. पवार यांनी प्रास्ताविक केले.