विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाचा एक हजार आशीर्वाद वृक्षलागवड व संवर्धन उपक्रम
पुणे : विद्यार्थी सहायक समिती पुणे व माजी विद्यार्थी मंडळ यांच्या वतीने ‘एक हजार आशीर्वाद वृक्ष लागवड व संवर्धन` उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी कल्याणी टेक्नोफोर्ज कंपनीच्या वतीने २१० रोपे व संरक्षक जाळीसाठी ४ लाख ४१ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत आंबेगाव व खेड तालुक्यात ५८ रोपांची लागवड करण्यात आली. तसेच, या रोपांना ५८ संरक्षक जाळी नुकतीच वितरण करण्यात आली. महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी कल्याणी टेक्नोफोर्जचे संचालक अनंत चिंचोलकर होते.
कल्याणी टेक्नो फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर व कंपनीच्या व्यवसाय युनिटचे प्रमुख राजेश पाटील, लक्ष्मण गोवे, विशाल मानकर, सचिन गायकवाड, रोहित कुलकर्णी, शिक्षा मिश्रा, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, जिभाऊ शेवाळे, गणेश काळे, राजू इंगळे, मनीषा गोसावी, रघुनाथ राऊत, ज्ञानेश्वर गटकळ, पुष्पा थोरात, नाना भाडळे, बंडू आवटे, बँक ऑफ बडोदाचे माजी व्यवस्थापक बळिराम आवटे, किसन सैद, डॉ. विठ्ठल चासकर, दीपक चासकर, तानाजी चासकर, मुकुंद बारवे, गणेश आवटे आदी उपस्थित होते.
या वेळी चिंचोलकर म्हणाले, ‘‘विकासाच्या नावाखाली वाढत्या जंगलतोडीमुळे तापमानवाढ ही एक जागतिक समस्या झाली असून, प्रत्येकाने देशी झाडांची लागवड करून संवर्धन करणे आता काळाची गरज आहे.” ‘‘कल्याणी ग्रुप आणि समितीचे नाते गेल्या काही दशकांपासून दृढ असून, कोरोनासारख्या कठीण काळात अशा सकारात्मक विद्यार्थी चळवळीला पर्यावरणासाठी उत्तेजन देण्यात आनंद आहे,” असे मत रवी नगरकर यांनी व्यक्त केले.
उपक्रमाचे समन्वयक सुनील चोरे यांनी प्रास्ताविक; तर विजय डोके यांनी सूत्रसंचालन केले. विकास कानडे यांनी आभार मानले. माजी विद्यार्थी संतोष कानडे, अंकुश भूमकर, अशोक भालेराव, रामदास सैद यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.


 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                