नवीन शैक्षणिक धोरण ‘व्हिजन-मिशन’ केंद्रित

नवीन शैक्षणिक धोरण ‘व्हिजन-मिशन’ केंद्रित

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल; ‘असोचेम’तर्फे आयोजित वेबिनार

पुणे : “भारतीय संस्कृती, परंपरा आणि शिक्षणपद्धती अतिशय महान आहे. मात्र, ब्रिटिश काळात लॉर्ड मेकॉले याने ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रभावाखाली आम्ही आजवर देशाची क्षमता ओळखली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात झाली. वैज्ञानिक अधिष्ठान, संशोधनाचा अंतर्भाव, कौशल्याभिमुख आणि रोजगाराभिमुख शिक्षण पद्धती राबवणारे हे धोरण आहे. ‘व्हिजन आणि मिशन’ केंद्रित या धोरणामुळे आगामी काळात भारत विश्वगुरू बनेल,” असे स्पष्टीकरण केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निःशंक यांनी दिले.


केंद्रीय शिक्षण मंत्रालय व असोचेम नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशन यांच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : शिक्षणाचे उज्ज्वल भविष्य’ या विषयावर नुकताच हा वेबिनार आयोजिला होता. यामध्ये डॉ. पोखरियाल यांनी बीजभाषण दिले. प्रसंगी असोचेमचे महासचिव दीपक सूद, मानव रचना एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भल्ला, शोभीत विद्यापीठाचे कुलपती कुंवर शेखर विजेंद्र, पुण्यातील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, अशोका विद्यापीठाचे संस्थापक विश्वस्त विनीत गुप्ता, एकेएस विद्यापीठ, सतणाचे चेअरमन आनंतकुमार सोनी, फ्लिपलर्न एज्युकेशनच्या व्यवस्थापकीय संचालक दिव्या लाल यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. रमेश पोखरियाल म्हणाले, “या धोरणामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात उत्साह आहे. आपल्या मातृभाषेत शिकण्याचा आग्रह यामध्ये आहे. भाषा ही केवळ शब्द नसून, ज्ञान-विज्ञान, संस्कृती व परंपरेचा सन्मान आहे. जपान, चीन, इस्राईल यासारखे अनेक देश मातृभाषेतून शिक्षण देतात. त्यामुळे इंग्रजीला प्राधान्य देण्याचा अट्टाहास असू नये. पंतप्रधान मोदी यांनी भारताची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे. आज स्वच्छ भारत, समर्थ भारत, सशक्त भारत, आत्मनिर्भर भारत बनविण्यावर भर दिला जात आहे. हे नवे शिक्षण धोरण विद्यार्थीकेंद्री असून, आज अनेक देशांकडून या धोरणाचे प्रारूप मागितले जात आहे. संशोधन, पेटंट आदी गोष्टीवर भर दिला असून, येत्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल पाहायला मिळतील.”


डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ” सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे परदेशात शिकायला गेलेले अनेक विद्यार्थी भारतात परतले आहेत. त्यांना पुन्हा तिकडे जायचे नसेल, तर ‘क्रेडिट फॉरवर्ड’ पद्धतीने भारतीय विद्यापीठांमध्ये उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी देण्याबाबत शिक्षण मंत्रालयाने विचार करावा. तशी तरतूद या शिक्षण धोरणात करायला हवी. बाकी हे धोरण विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयात शिकण्याची संधी देणारे आहे. राष्ट्राच्या विकासात मोलाची भर टाकणारे हे धोरण ठरेल. राष्ट्रसेवा, उद्योगाभिमुख असे हे धोरण असून, भारतीय संस्कृती, परंपरा पुन्हा नव्याने समृद्ध होणार आहे.”


विनीत गुप्ता, कुंवर शेखर विजेंद्र, डॉ. प्रशांत भल्ला, दिव्या लाल यांनीही आपली मते मांडली. नीरज अरोरा यांनी सूत्रसंचालन केले. आनंतकुमार सोनी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *