विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्राच्या वतीने प्रवीण तरडे यांच्याशी विशेष संवादाचे आयोजन (Special interaction with Praveen Tarde organized by the Student Development Center of the Student Support Committee) करण्यात आले होते. सेनापती बापट रस्त्यावरील समितीच्या लजपत विद्यार्थी संकुल येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, चंद्रकांत कुलकर्णी, प्रभाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तुषार रंजनकर यांनी समितीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. समितीच्या कार्याची माहिती देणारी ध्वनिचित्रफीतही दाखवण्यात आली.
(Pravin tarde said)प्रवीण तरडे म्हणाले, “पूरपरिस्थितीवेळी बातम्या पाहताना ओल्या दुष्काळाची तीव्रता आणि भयानकता जाणवली. त्यामुळे चित्रीकरण थांबवून मदत करण्याचा निर्णय घेतला. माध्यमांसाठी या घटना इव्हेंटप्रमाणे असतात. दोन दिवसांत त्यांना दुसरा इव्हेंट मिळतो आणि ते निघून जातात. पण मूळ प्रश्न त्याच्या दाहकतेसह तसाच असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी, त्यांचे कुटुंबीय आपल्यासमोरच्या प्रश्नांचा अभ्यास करत नाहीत, हा माझा निष्कर्ष आहे. जमिनी विकण्याआधी खरेदी करणाऱ्याचा हेतू कोणता, वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत, नजिकच्या भविष्यात काय घडू शकते, जमिनी कशासाठी चढ्या भावाने खरेदी केल्या जात आहेत, हे प्रश्न शेतकऱ्यांना पडायला हवेत.”
राजकारण्यांच्या, धनदांडग्यांच्या, व्यापाऱ्यांच्या टोळधाडी जमिनींवर पडण्याआधी बैल, गाई, म्हशी, कोंबड्या, शेळ्या, बकऱ्या असे शेतीपूरक उपक्रम गुंडाळून, फक्त एकाच पिकावर अवलंबून राहण्याचा प्रकार का घडला. कर्जमाफीची वाट पाहण्याची वेळ का आली, हमीभाव नसेल तर एकत्रितपणे त्या पिकाला पर्याय का नाही शोधला, असे अनेक प्रश्न प्रवीण तरडे यांनी उपस्थित करत, या विषयाची व्याप्ती स्पष्ट केली. मी कलाकार आहे, मी कलेच्या माध्यमातून या प्रश्नाकडे पाहतो. माझ्या चित्रपटांतून तसा मेसेज जाईल, याची मी काळजी घेतो, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना तरडे यांनी विविध समस्यांच्या मूळाशी जाण्याची गरज अधोरेखित केली. मी अडचणीत असताना मलाही काहींनी मदत केली होती, याची जाणीव ठेवून मी आता इतरांनाही मदत केली पाहिजे, ही भावना विद्यार्थ्यांनी सतत मनात बाळगली पाहिजे. आपल्या शहरातील शिक्षणासाठी आपले गावात राहणारे, जमीन कसणारे पालक कष्ट करत आहेत, याचे सतत स्मरण राहिले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने केला पाहिजे. शहरी घराशी गावातले एखादे घर जोडले गेले पाहिजे. एक वेगळी मेंटारशिप निर्माण झाली पाहिजे, हे सामाजिक दायित्व विद्यार्थ्यांनी अंगिकारले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
