भावी शिक्षकांना केले जाणार मोफत ऑनलाईन मार्गदर्शन
पुणे, दि. २ – शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) होणारी फसवणूक टाळण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने पुढाकार घेतला असून, भावी शिक्षकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने हे मार्गदर्शन सत्र होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य कार्यक्रम संयोजक भाग्यश्री विवेक ठाकरे (Bhagyashree Vivek Thackeray, State Program Coordinator of Nationalist Youth Congress ) यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष मृणाल ओव्हाळ, पुणे पूर्व शहराध्यक्ष नम्रता बोंदर, पुणे शहर उपाध्यक्ष हेमा रणदिवे आदी उपस्थित होत्या.
(Bhagyshree thakre said)भाग्यश्री ठाकरे म्हणाल्या, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने राज्याचा शिक्षण विभागामार्फत ही टीईटी परीक्षा येत्या २३ नोव्हेंबरला आणि त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘टीएआयटी’ परीक्षा होत आहे. गेल्यावेळेच्या परीक्षेत दलालांनी अनेकांची फसवणूक केली होती. यंदाही काही ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर परीक्षेबाबत संभ्रम निर्माण करून कोचिंगच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. त्यातून गोंधळ उडत असून, या प्रकाराला चाप बसावा, यासाठी टीईटी परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये सजगता आणि सक्षमता येण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, युवानेते पार्थ पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. संध्या सोनवणे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनात हे शिबीर दोन आठवडे ऑनलाईन पद्धतीने मोफत राबविले जाणार आहे. ‘टीईटी’साठी राज्यभरातून ४ लाख ८० हजार भावी शिक्षकांनी परीक्षार्थी उमेदवार म्हणून अर्ज केले आहेत. या परीक्षार्थीच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून ऑनलाईन पद्धतीने विविध विषयांचे शिक्षणतज्ञ व्हिडिओ सेमिनार घेऊन मार्गदर्शन करतील. शिवाय सराव प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका सुद्धा उमेदवारांना ऑनलाईनच पुरविण्यात येतील. यासाठी परीक्षार्थी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.”
‘क्यूआर कोड’वर करावी नोंदणी:
टीईटी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या, डीएड व बीएड शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन शिबीर फायद्याचे ठरणार आहे. या शिबिरात सहभागासाठी गुगल लिंक किंवा क्यूआर कोड स्कॅन करून मोफत ऑनलाईन नोंदणी करावी. टीईटी व टीएआयटी या परीक्षासाठी तयारीत असणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांनी दलालांपासून दूर राहून परिश्रमपूर्वक अभ्यास व चिकाटीने यश मिळावे म्हणून शिबिराचा लाभ घ्यावा.
नोंदणीसाठी https://tinyurl.com/mrx54k2x या लिंकवर किंवा सोबतच्या क्यूआर कोडवर क्लिक करावे. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख प्रशांत महाशब्दे यांना ९८२३२९२०९२ यावर संपर्क करावा, असे आवाहन संयोजकांनी केले.
