शब्दसुरांच्या साथीने तीन भारतरत्नांना सांगीतिक अभिवादन

शब्दसुरांच्या साथीने तीन भारतरत्नांना सांगीतिक अभिवादन

 
मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी निधी संकलन; रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजतर्फे आयोजन

पुणे, दि. २१-  भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या बुलंद स्वरांच्या आठवणी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरांच्या स्मृती आणि ज्येष्ठ राजनीतिज्ञ, कवी अटल बिहारी वाजपेयींची समर्थ शब्दकळा, यांचा त्रिवेणी संगम रसिकांनी शनिवारी सायंकाळी अनुभवला. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या फर्ग्युसन रोडवरील संकुलातील मोडक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

निमित्त होते, मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील मुलामुलींसाठी सहाय्यता निधी उभारण्यासाठी आयोजिलेल्या ‘तीन भारतरत्न’, या सांगीतिक मैफलीचे!  (‘Three Bharat Ratnas’, a musical concert organized to raise funds for the children of flood-affected areas of Marathwada)    भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर व कवी अटलबिहारी वाजपेयी यांच्या गाणी, कविता आणि आठवणी असा गोफ या मैफलीच्या माध्यमातून रसिकांनी अनुभवला. गायिका मनीषा निश्चल, गायक अमोल निसळ व संजीव मेहेंदळे यांच्या बहारदार सादरीकरणाने ही मैफल दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी झाली. मनीष आपटे यांच्या ओघवत्या निवेदनाने मैफलीचा आनंद द्विगुणित झाला. 

 
गायिका मनीषा निश्चल यांनी ज्योतिकलश झलके, अपनेही मन से कुछ मांगे, राम का गुणगान करिये, मेंदीच्या पानावर, दिल हुम हुम करे… ही गीते सादर केली. संजीव मेहेंदळे यांनी आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, राम का गुनगान करिये, भेटीलागी जीवा… या रचना ऐकवल्या, तर अमोल निसळ यांनी आता कोठे धावे मन, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, राजस सुकुमार मदनाचा पुतळा.. यांचे सादरीकरण केले. बाजे रे मुरलिया बाजे या रचनेने या रंगतदार मैफलीची सांगता झाली.

पं. भीमसेन जोशी यांच्या संतवाणीतील काही निवडक रचना, प्रखर राजनीतिज्ञ तथा कवी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काही कविता आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची काही अभिजात गीते, असा मेळ या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुळून आला. विवेक परांजपे (सिंथेसायजर आणि संगीत संयोजन), यश भंडारे (की बोर्ड), अमेय ठाकूरदेसाई (तबला), अनिल करंजवकर (पखवाज), चेतन परब (आक्टोपड) यांनी पूरक साथसंगत केली. 

रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेट सेट गो हॉलिडेज प्रस्तुत, मनीषा निश्चल्स महक निर्मित ‘तीन भारतरत्न’ या कार्यक्रमाला सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापकअध्यक्ष डाॅ. संजय बी. चोरडिया, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिकाई) रघुनाथ येमुल गुरुजी, विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, ‘रोटरी’चे अध्यक्ष जीवराज चोले, सचिव तेजस्विनी थिटे उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजचे अध्यक्ष जीवराज चोले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मी स्वतः समितीचा माजी विद्यार्थी आहे. विद्यार्थी समितीला कधीच विसरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणे, हे कर्तव्य समजून, या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक लाख ५१ हजारांचा निधी समितीला देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

(Prof. Dr. Sanjay chordiya said)प्रा. डाॅ. संजय बी. चोरडिया म्हणाले, समितीच्या कार्याला मी अभिवादन करतो. अशा कार्यात सहभागी होणे हे नैतिक व मूल्याधिष्ठित कार्य आहे, असे आम्ही समजतो. त्यामुळे जिथे कमी आहे, तिथे सूर्यदत्त आहे, असे आश्वासन मी देतो.

तुषार रंजनकर म्हणाले, समितीमध्ये निम्मे विद्यार्थी मराठवाड्यातील आहेत. विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्यविकासाच्या संधी हे समितीचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांची वेगळ्या प्रकारची जडणघडण समितीमध्ये होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *