– ‘राष्ट्रवादी’च्या चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे राज्यस्तरीय लघुपट महोत्सव
– मंत्री नरहरी झिरवाळ, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पुणे, दि. १५- ऊसतोड मजूर महिलांचे आरोग्य व त्यांचे जगणे मांडणाऱ्या ‘कूस’ या लघुपटाला राज्यस्तरीय उत्कृष्ट लघुपट (The short film ‘Koos’ was awarded the best short film at the state level.) म्हणून तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या लघुपटाची निर्मिती उचित मीडिया सर्व्हिसेसने (Appropriate media services) केली असून, दिग्दर्शन व लेखन डॉ. ज्ञानेश्वर जाधवर यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या लघुपट महोत्सवाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आगीनफूल लघुपटास प्रथम, तर चंद्रलेखा लघुपटास द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत राज्यभरातून ३५० पेक्षा अधिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यातून कूस लघुपटाने तिसरा क्रमांक मिळवला.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे (actor makarand anaspure )यांच्या हस्ते ‘कूस’ (kus laghupat) लघुपटाच्या टीमला सन्मानित करण्यात आले. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमावेळी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, चित्रपट महामंडळाचे मेघराज राजेभोसले, अभिनेत्री देविका दफ्तरदार, अभिनेते मिलिंद दास्ताने, सुनील गोडबोले, प्रभाकर मोरे, असित रेडीज, राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे, बाबा धुमाळ, संयोजक बाबासाहेब पाटील, नितीन धवणे पाटील, आदित्य संजयराव, अपेक्षा चव्हाण आदी उपस्थित होते. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांचे जगणे, त्यांच्या मासिक पाळीचा व आरोग्याचा प्रश्न, गर्भाशय पिशवी काढण्याचे प्रकार आणि त्यातून होणारी त्या स्त्रीची, कुटुंबाची कुचंबणा आदी गोष्टी या लघुपटातून मांडण्यात आल्या आहेत. डॉ. ज्ञानेश्वर जाधवर यांच्याच अनेक पुरस्कारप्राप्त ‘कूस’ या कादंबरीवर आधारित हा लघुपट असून, निर्माता व लेखक-दिग्दर्शक ऊसतोड मजूर कुटुंबातून आल्याने अतिशय वास्तविक रूपात तो मांडला गेला आहे. विठ्ठल काळे यांच्यासह अनुया कळसकर, वैशाली केंजळे, डॉ. सोनाली घाटणेकर, अनिल कांबळे व जीवराज चोले यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत.
निर्माता जीवराज चोले व दिग्दर्शक डॉ. ज्ञानेश्वर जाधवर यांनी हे पारितोषिक स्वीकारले. ५५,५५५/- रुपये, मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. अभिनेता विठ्ठल काळे यांना उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. यावेळी कार्यकारी निर्माती तेजस्विनी थिटे, अभिनेता अनिल कांबळे, अभिनेत्री डॉ. सोनाली घाटणेकर, वेशभूषाकार भाग्यश्री राऊत, केशभूषाकार प्राजक्ता लोंढे, सहायक कलादिग्दर्शक लखन चौधरी आदी उपस्थित होते.