बालगोपाळांनी लुटला अभिनव ‘सायकल दहीहंडी’चा आनंद

बालगोपाळांनी लुटला अभिनव ‘सायकल दहीहंडी’चा आनंद

जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे २०० सायकलचे गरजूंना वाटप

पुणे, दि. १७ – राधे राधे… श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी… हाथी घोडा पाल की, जय कन्हैयालाल की… गोपालकृष्ण भगवान की जय… याचा जयघोष करत ढोलताशाच्या गजरात बालगोपाळांनी अभिनव अशी सायकल दहीहंडी फोडली.  (Balgopal breaks bicycle Dahi Handi in an innovative way)  जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशन  (Jedhe Social Welfare Foundation and Indrani Balan Foundation)   यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती मित्र मंडळाच्या संयोजनातून शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव सायकल दहीहंडीचे आयोजन केले होते.

बालगोपाळांनी ही अभिनव सायकल दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. या सायकल दहीहंडीतील २०० सायकलींचे मोफत वाटप भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील रायरी, सोंडे माथाना, कोंदवाडी, मेटपिलावरे, पाली बुद्रुक, वाजेघर बुद्रुक, लव्ही बुद्रुक, खेचरे, कळमशेत, बेलावडे, मांदेडे आणि बावीसमैल या अतिदुर्गम भागात वसलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांना व पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी सायकलींच्या मधोमध क्रेनला बांधलेली दहीहंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. मृत्युंजय वाद्यपथक, गणेशा वाद्यपथक या दोन पथकांनी बहारदार ढोलवादन केले.

यावेळी उद्योजक पुनीत बालन, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, माजी नगरसेवक अविनाश बागवे, संयोजक कान्होजी दयानंद जेधे, गौरव बोराडे, मंडळाचे कार्यकर्ते बलराज वाडेकर, साहिल भिंगे, साईराज नाईक, प्रीतम परदेशी, उमेश सपकाळ, मंगेश कोंढरे, राजवीर जेधे आदी उपस्थित होते.

पुनीत बालन म्हणाले, “आजवर इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे पुणे, सातारा व अन्य जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास आणि क्रीडा क्षेत्राशी निगडित ज्ञान मिळण्यास वेळ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. यंदा या अभिनव सायकल दहीहंडीच्या माध्यमातून २०० सायकलींचे वाटप करताना आनंद होत आहे.”

कृषिकेश रावले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमातून सामाजिक बांधीलकी जपत गरजू मुलांना सायकल देऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे. अतिशय विधायक पद्धतीने सण, उत्सव साजरा करण्याची ही पद्धत भावली. ग्रामीण भागातील या बालगोपाळांच्या चेहऱ्यावरील सायकल मिळाल्याचा आनंद सुखावणारा असल्याचे ते म्हणाले.

(Kanoji jedhe said)कान्होजी जेधे म्हणाले, “दरवर्षी काही नवीन करण्याचा आमचा ध्यास असतो. या उपक्रमातून आपण समाजाला कशी मदत करू शकू, याकडे जास्त कल असतो. समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून गेल्यावर्षीपासून सायकल हंडीतून समाजातील गरजू मुलांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *