कृत्रिम बुद्धिमतेमुळे माणसाची बौद्धिक क्षमता खालावतेय –  अच्युत गोडबोले

कृत्रिम बुद्धिमतेमुळे माणसाची बौद्धिक क्षमता खालावतेय – अच्युत गोडबोले

मोबाईलचा अतिवापर माणसाला अधोगतीकडे नेणारा
 
विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ‘मोबाईल व्यसनमुक्ती’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, दि ६ – “मोबाईल हे मूलतः संवादाचे माध्यम होते. मात्र, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे त्यातील संवाद हरपून अन्य गोष्टी मानवी मेंदूला वेडे करू पाहत आहेत. मोबाईलचा गरजेपुरता वापर केला, तर आपल्या जगण्याला पूरक असे साधन आहे. मात्र, त्याचा अतिवापर माणसाला अधोगतीकडे घेऊन जाणारा आहे. कृत्रिम बुद्धिमतेमुळे आपली विचार करण्याची क्षमता खुंटत असून, माणसाच्या बौद्धिक क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व वक्ते अच्युत गोडबोले  (Famous writer and speaker Achyut Godbole)   यांनी केले. 

विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर व माजी विद्यार्थी नवनाथ जगताप लिखित, रुद्र प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘मोबाईल व्यसनमुक्ती’ या पुस्तकाचे प्रकाशन अच्युत गोडबोले व ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते    (The book ‘Mobile Addiction Relief’, published by Rudra Prakashan, was released by Achyut Godbole and senior entrepreneur Prataprao Pawar.)  झाले. समितीच्या सेनापती बापट रस्त्यावरील लजपतराय भवन विद्यार्थी संकुलात झालेल्या कार्यक्रमात समितीचे कायम विश्वस्त डॉ. भाऊसाहेब जाधव, सी. ई. पोतनीस, सामाजिक कार्यकर्ते यजुर्वेंद्र महाजन, प्रदीप गारटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जवळपास ५०० पेक्षा अधिक लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

अच्युत गोडबोले म्हणाले, “टीव्हीपाठोपाठ आलेल्या मोबाईल, इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे एक मोठा विस्फोट झाला आहे. ज्ञानवर्धनाचे साधन होण्याऐवजी त्याचे व्यसन लागून न्यूनगंड तयार होऊ लागला आहे. तुलनात्मक मानसिकतेमुळे नैराश्य येण्यासह आत्मविशास खालावत आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. सतत गुंतून राहिल्याने शारीरिक व्याधींनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अतिवापर टाळा. स्वतःची विचार क्षमता विकसित करा. सोशल व इमोशनल इंटेलिजन्स, सांघिक भावना, श्रवणकला, वाचन यावर भर दिला पाहिजे. समितीमध्ये या सर्व गोष्टींवर भर दिला जातो, याचा आनंद आहे.”

प्रतापराव पवार म्हणाले, “मोबाईलचा उपयुक्त वापर चांगला आहे. मात्र, सर्वकाही त्यावर अवलंबून असता कामा नये. स्वतःसाठी वेळ देता यावा. आपला प्राधान्यक्रम ठरवून वेळेचे योग्य नियोजन केले, तर तुमचे चारित्र्य अधिक संपन्न होण्यास मदत होईल. सबबी न सांगता केलेले कष्ट, जपलेला प्रामाणिकपणा आणि शिस्त आपल्याला यशाकडे घेऊन जाते. तुमचे चारित्र्य मोबाईल नव्हे, तर स्वतः तुम्ही घडवत असता. त्यामुळे स्वतःला समृद्ध करण्यासाठी इतर अनेक पर्यायांचा योग्य वापर करा.”

यजुर्वेंद्र महाजन यांनी मोबाईलचा वापर अनेकांना फायद्याचा ठरतो, असे सांगत नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे कारणही मोबाईलच असल्याचे सांगितले. तुषार रंजनकर यांनी मोबाईल, इंटरनेटच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्याची गरज अधोरेखित केली. मेंदूवर थेट परिणाम करणाऱ्या मोबाईलच्या व्यसनाला आपण गांभीर्याने घ्यायला हवे, असे नवनाथ जगताप यांनी नमूद केले. पर्णवी म्हस्के, सुप्रिया केळवकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *