एएनपी केअर फाउंडेशनतर्फे रहाटणी येथे पूर्णतः मोफत सुविधा; २० हजार रुग्णांवर फिजिओथेरपीचे उपचार
पुणे : सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून चार वर्षांपूर्वी सुरु केलेल्या एएनपी केअर फाउंडेशनच्या डायलिसिस केंद्रात ३८ हजार १९५ गरजू रुग्णांनी लाभ घेतला आहे. या डायलिसिस केंद्राला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता, तसेच पॉलिकॅब सोशल वेल्फेअर फाउंडेशच्या वतीने उभारलेल्या विस्तारित कक्षाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले होते.

यावेळी पॉलिकॅब इंडिया लिमिटेडचे प्रमोटर अजय जयसिंगानी, कार्यकारी संचालक राकेश तलाठी, सहयोगी उपाध्यक्ष नीरज कुंदनानी, एएनपी केअर फाउंडेशनचे प्रमुख मनोहर फेरवानी, सुनील अडवाणी, सुरेश जेठवानी, सुरेश फेरवानी, रवी फेरवानी, अशोक वासवानी, ऋषी अडवाणी, जवाहर कोटवानी, नंदकुमार काटे यांच्यासह सिंधी समाजातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
राकेश तलाठी म्हणाले, “समाजासाठी समर्पित भावनेने कार्यरत एएनपी केअर फाऊंडेशनशी जोडले गेलो आहोत याचा आनंद आहे. गोरगरीब रुग्णांना डायलेसिसची सुविधा अनेकांसाठी नवसंजीवनी ठरली आहे. पॉलिकॅब इंडिया अनेक सामाजिक उपक्रमांत भरीव योगदान देत आहे. यापुढेही डायलिसिससाठी काही मदत लागल्यास आमचे सहकार्य राहील.”
मनोहर फेरवानी म्हणाले, “कोरोना काळात या डायलेसिस केंद्राची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी या डायलिसिस केंद्रावर अकरा मशिन्स होत्या. पुढे त्यात आणखी भर पडली. सध्या एकूण २५ मशिन्स कार्यरत आहेत. दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जवळपस २५ प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि स्टाफ डायलिसिस करत आहे. येथील स्वच्छता, रुग्णांसाठी असलेल्या सुविधांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.”
“डायलेसिससह फिजिओथेरपी उपचार केंद्र सुरु असून, तीन डॉक्टर ही सुविधा पुरवतात. पिंपरी–चिंचवडसह पुणे शहर, आंबेगाव व खेड तालुक्यातील गरजू रुग्णांना या सुविधांचा लाभ होत आहे. सोमवार ते शनिवार रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत रुग्णांना डायलिसिस सेवा दिली जाते. गरजू रुग्णांनी रॉयल मायस्टिक, २८/2 ब, शिवराजनगर, रहाटणी, पिंपरी-पुणे येथे किंवा ९९७००४३००५/०६ किंवा contact@anpcarefoundation.org येथे नावनोंदणी करावी. डायलिसिससह नाश्ता व अन्य सुविधा पूर्णतः मोफत दिली जाते. अधिकाधिक गरजू रुग्णांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा,” असेही मनोहर फेरवानी यांनी नमूद केले.