दुसरा राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव बुधवारी

दुसरा राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव बुधवारी

गणेश चप्पलवार यांची माहिती; पर्यटन संचालनालय व परभन्ना फाउंडेशनचा पुढाकार

पुणे : जागतिक पर्यटन दिवस व मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष यानिमित्त पर्यटन संचालनालय आणि परभन्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा महोत्सवात १२ राज्यांतून आलेल्या ५५ लघुपट, माहितीपटांपैकी दहा माहितीपट, चार लघुपट व तीन व्ही-लॉगचे स्क्रीनिंग होणार आहे. येत्या बुधवारी (दि. २७ सप्टेंबर २०२३) पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या लघुपट महोत्सव होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये, कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल उपस्थित राहणार आहेत. ‘डिजिटल युगातील पर्यटन’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात राजेंद्र केळशीकर, नितीन शास्त्री व राजिंदर कौर जोहाल सहभागी होणार आहेत, अशी माहिती लघुपट महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी महोत्सवाच्या सल्लागार समितीचे प्रमुख मोना देठे, समिती सदस्य डॉ. राजीव घोडे, चित्रपट परीक्षक जुनेद इमाम, महोत्सवाचे संचालक असीम त्रिभुवन, माध्यम प्रमुख के. अभिजीत आदी उपस्थित होते.
 
गणेश चप्पलवार म्हणाले, “दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवसाचे औचित्य साधून परभन्ना फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. भारत हा विविधतेत एकतेने नटलेला देश आहे. भारताच्या पर्यटनाचे विविध रूप, छटा लोकांनी पाहिल्या व अनुभवल्या पाहिजेत. यावर लिहिले आणि वाचले गेले पाहिजे. जगाला भारताच्या पर्यटनाची ओळख व्हावी आणि पर्यटनात नवीन संकल्पना, धोरणे कशी राबवता येतील, यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण कायमच सर्वाना आकर्षित करत असतात. त्याची जगाला ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांनी भारतात येऊन हे पाहावे, ही यामागची भावना आहे.”
 
कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल चंद्रशेखर भरसावळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रातील काही विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासह सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट व्ही-लॉग असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. लघुपट महोत्सवाचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद ब्रह्मे, पंकज इंगोले, लेखक आणि दिग्दर्शक जुनेद इमाम व नितीन पाटील यांनी काम पहिले आहे, असे चप्पलवार यांनी नमूद केले.
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *