पुणे : शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अग्रणी संस्था पुणे विद्यार्थी गृहाचा ११५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे विद्यार्थी गृहाच्या नियामक मंडळाच्या सदस्या पौर्णिमा लिखिते, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र वि. बोऱ्हाडे, उपकार्याध्यक्ष सुभाष म. जिर्गे, कार्यवाह संजय नि. गुंजाळ, कोषाध्यक्ष कृष्णाजी मा. कुलकर्णी, कुलसचिव दिनेश पि. मिसाळ, माजी कार्याध्यक्ष सुनील पां. रेडेकर, संचालक आनंद कुलकर्णी, राजेंद्र कडुस्कर, अमोल जोशी, रमेश कुलकर्णी, प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे यांच्यासह सल्लागार, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतनक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
राजेंद्र बोऱ्हाडे म्हणाले, “सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून स्थापन झालेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या वाटचालीत अनेक दानशूरांचे योगदान, अनेकांचा त्याग यामुळे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी गेली ११५ वर्षे हा ज्ञानयज्ञ तेवत राहिला आहे. संस्थेने अनेकांना घडवले आहे. मूलभूत ध्येयापासून विचलित न होता कालानुरूप बदल करत संस्थेने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले, ही समाधानाची बाब आहे.”
सुनील रेडेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, संस्थेच्या सर्व विभागाची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. अभियांत्रिकी, मुद्रण महाविद्यालयात विद्यार्थ्यांकड़ून अनेक तंत्राविष्कार पाहायला मिळत आहे. पुणे व नाशिक येथील महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करुन घेतले असून ए ग्रेड मिळाली आहे. सकाळी संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम मंदिरात शास्त्रोक्त पूजा व मंत्रघोष करण्यात आला.