दहावे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन कर्जतमध्ये
आमदार रोहित पवार, शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांना पुरस्कार जाहीर
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत (अहमदनगर) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांतीदिनी दहाव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ आमदार रोहित पवार यांना, तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये होणाऱ्या या संमेलनाची सुरुवात ‘आम्ही भारतीय’ अस्मिता दर्शन यात्रेने होईल. संमेलनाध्यक्ष डॉ. संजय नगरकर, उद्घाटक प्रा. शंकर आथरे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक प्रकाश पाटील, डॉ. बंडोपंत कांबळे, बबनराव भेगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रसंगी गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार, तसेच बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराचे वितरण होईल. निमंत्रक प्रा. सुखदेव कोल्हे आणि प्रा. प्रशांत रोकडे संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत, असे प्रकाश रोकडे यांनी नमूद केले.