‘सी-डॅक’तर्फे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर
ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभ्यासक्रम
पुणे : प्रगत संगणन विकास केंद्रामार्फत (सी-डॅक) ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड व्हर्च्युअल रियालिटी’ या विषयावरील अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला. यासंदर्भात ‘सी-डॅक’ आणि ट्रिनिटी कॉलेजमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या कार्यक्रमांतर्गत १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून संगणकाचा वाढता वापर प्रभावी करून आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांना नॅसकॉमचे प्रमाणपत्र मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित केवळ दोन महाविद्यालयांची निवड झाली असून, त्यात ट्रिनिटी कॉलेजचा समावेश आहे.
प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकारातून ‘सी-डॅक’मधील वैशाली महेशकर व अंकुर गजभिये यांच्या सहकार्याने हा सामंजस्य करार झाला. या अभ्यासक्रमाविषयी, तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना होणाऱ्या याच्या उपयोगाविषयी डॉ. अभिजित औटी यांनी सविस्तर माहिती दिली. केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक कल्याण जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक मेजर जनरल (नि.) समीर कल्ला यांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
कल्याण जाधव म्हणाले, “देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व विकासासाठी सर्वानी एकत्र येऊन अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे. प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात अशा स्वरूपाचे नवे तंत्रज्ञान आत्मसात करून शिक्षण क्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी वाटचाल करणे गरजेचे आहे.”