सीए निहार जांबूसरिया यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआय’तर्फे ‘सीएफओ-सीईओ’ मीटचे आयोजन
पुणे : ”उद्योगाला उभारी घेण्यासाठी सनदी लेखापाल सल्लागार म्हणून काम करत असतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला पूरक प्रशिक्षण सनदी लेखापालांना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. संशोधनाला प्रोत्साहन देत आहोत. मागील ८-९ महिन्यात आपल्यासमोरही अनेक आव्हाने आली आहेत. पण व्यावसायिकांना, उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्याचे दायित्व आपल्यावर आहे. आपण त्यासाठी पुढाकार घेऊन काम करावे,” असे प्रतिपादन दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) उपाध्यक्ष सीए निहार जांबूसरिया यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेसच्या (सीएमआयबी) वतीने आयोजित ‘सीएफओ-सीईओ’ संवाद सत्रात ‘सद्यस्थितीत सीएफओ-सीईओ यांची भूमिका’ या विषयावर रॉबिन बॅनर्जी बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मेरियट येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए निहार जांबूसरिया, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘सीएमआयबी’चे चेअरमन सीए राजेश शर्मा, सीए हंस राज चुग, सीए अभिषेक झावरे, पुणे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चासत्रात डॉ. हरप्रीत सिंग यांनी आरोग्य, प्रमोद घोरपडे यांनी औषधनिर्माण, सीए सुहास कड्लस्कर यांनी ऍटोमोबाइल, सीए अनिल पटवर्धन यांनी माहिती तंत्रज्ञान, सीए संदीप बात्रा यांनी उद्योग क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले. सीए समीर लड्डा यांनी चर्चासत्राचे समन्वयन केले. उद्योग क्षेत्रातील १२०० पेक्षा जास्त मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्यक्ष व ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. चंद्रशेखर चितळे यांनी नवीन बदल, तंत्रज्ञान आणि सध्याच्या वातावरणामुळे आलेली आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले.
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सहकारी बँका चांगले काम करत आहेत. या क्षेत्रात देशात व परदेशातही सीएना मोठ्या संधी आहेत. त्यासाठी ‘आयसीएआय’कडून पावले उचलली जात आहेत. व्यावसायिक व्यवस्थापनाला आज सगळेच प्राधान्य देत आहेत. उद्योग क्षेत्रात असलेल्या संधीकडे आपण पाहावे. त्यानुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत.”
सीए राजेश शर्मा म्हणाले, “देशाच्या आर्थिक विकासात सनदी लेखापालांची भूमिका महत्वाची आहे. आपले दायित्व ओळखून आपण अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी प्रामाणिक मेहनत घ्यावी. कोरोनाच्या संकट काळातही सनदी लेखापालांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.” प्रास्ताविक सीए अभिषेक धामणे व सीए अभिषेक झावरे यांनी केले. आभार सीए हंस राज चुग यांनी मानले.