व्यवसायाच्या जागतिक संधी एकाच व्यासपीठावर आणण्याचा  ‘जीआयबीएफ’चा पुढाकार कौतुकास्पद : डॉ. नीलम गोऱ्हे

व्यवसायाच्या जागतिक संधी एकाच व्यासपीठावर आणण्याचा ‘जीआयबीएफ’चा पुढाकार कौतुकास्पद : डॉ. नीलम गोऱ्हे

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आयोजित भारत-आफ्रिका व्यावसायिक परिषदेत आफ्रिकेतील १७ राजदूतांनी मांडल्या व्यावसायिक संधी

पुणे : “विकसनशील आफ्रिकन देशांत व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. आजवर तेथील बाजारपेठा व व्यावसायिक क्षेत्राकडे कोणाचे फारसे लक्ष गेलेले नव्हते. त्यामुळे व्यवसाय विस्ताराला आफ्रिकन देशांत मोठा वाव आहे. जागतिक स्तरावरील व्यवसायाच्या अशा संधी आणि निर्यातदार, आयातदार, व्यावसायिक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचा (जीआयबीएफ) पुढाकार कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले. भारत सरकारचे सहकार्य असल्याचा विश्वासही आफ्रिकन राजदूतांना या कार्यक्रमातून दिल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

आफ्रिकन संघाच्या ‘जी-२०’ सदस्यत्वानंतर ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीने दोन दिवसीय भारत-आफ्रिका व्यावसायिक परिषदेचे पुण्यात भव्य आयोजन केले होते. जोशी फार्म्स अँड रिसॉर्ट्स येथे आयोजित या ऐतिहासिक व्यावसायिक परिषदेला आफ्रिकन देशांतील १७ राजदूतांसह उच्चायुक्त व अन्य पदाधिकारी, कृषी, शिक्षण, आरोग्य, औषधनिर्माण, खनिकर्म, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, जेम्स अँड ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स, ऍटोमोबाइल, एफएमसीजी, बांधकाम, लॉजिस्टिक्स, लोखंड व स्टील, ऊर्जा, माध्यम, तेल व गॅस यासह इतर अनेक उद्योग क्षेत्रातील ८०० पेक्षा अधिक व्यावसायिक, निर्यातदार, आयातदार, गुंतवणूकदार सहभागी झाले होते. डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ‘जीआयबीएफ’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, महासचिव दीपाली गडकरी, संचालक अभिषेक जोशी आदी उपस्थित होते.

या परिषदेत आफ्रिकन राजदूतांचे व्यावसायिक संधींबाबतचे सादरीकरण, बीटूबी मीटिंग्ज, परिसंवाद, चर्चासत्रे झाली. भारतीय निर्यातदार, आयातदार, व्यापारी आणि उद्योजकांना या व्यापक व आशादायक बाजारपेठांचा शोध घेण्यासाठी मदत करण्याची वचनबद्धता ‘जीआयबीएफ’ने व्यक्त केली. ‘जीआयबीएफ’चे मुखपत्र असलेल्या ‘बिझनेस टायकून’ या मासिकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. भारतीय उद्योजकांना आफ्रिकन देशांत व्यवसायाच्या अनेक संधी असून, आम्ही त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करून देऊ. त्यामुळे भारतीयांनी आफ्रिकन देशांत व्यवसाय करण्यासाठी यावे, असे निमंत्रण सर्वच राजदूतांकडून उपस्थित उद्योजकांना देण्यात आले.

डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘जी-२०’ बैठकीचे भारताच्या साहाय्याने सदस्यत्व मिळाल्याबद्दल आफ्रिकन संघ नेतृत्वाचे व सर्व राजदूतांचे अभिनंदन करतो. भारत-आफ्रिका व्यावसायिक परिषद व्यापारी भागीदारी, निर्यात-आयातीच्या संधींचा शोध, आर्थिक वृद्धी आणि परस्परांच्या बाजारपेठांमधील सहकार्याची अफाट क्षमता उघडणारा महत्त्वाचा पूल आहे. भविष्यातील उभय देशांतील व्यवसाय वृद्धीसाठी ‘ग्रो टुगेदर’ हा यशाचा मंत्र असणार आहे. 

दीपाली गडकरी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व आभार मानले. अभिषेक जोशी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *