
पुणे : आचार्य तुषार भोसले यांच्या भंपकपणा मुळे मंदीरे उघडण्याच्या विषय चिघळला आहे. कार्तिक वारी संदर्भात वारकरी नेत्यांनी भोसले यांच्या पध्दतीने न जाता वारकरी पध्दतीने हा विषय मांडायला हवा. प्रगल्भ, निष्ठावंत वारकरी नेत्यांनी पुढे यायला हवे. विषय वारकऱ्यांचे, साऱ्या आंदोलनाला बळ वारकऱ्यांचे मात्र चमकोगीरी भलत्यांची हे खपवून घेतले तर वारकऱ्याचे प्रश्न कधीच सुटणार नाही, असे स्पष्ट मत कीर्तनकार आणि वारकरी दर्पणचे संपादक सचिन पवार यांनी मांडले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत. महत्वाची पायी आषाढी वारी झालेली नाही. मंदिरे उघडावीत ही सर्वांचीच इच्छा आहे. कोरोनाच्या काळात वारकरी संप्रदायाने दाखवलेली शिस्त, केलेले सहकार्य अतुलनीय आहे. वारकरी हे सहिष्णू आहेत. त्यांना सामाजिक जबाबदारीचे भान आहे. समाजाची काळजी आहे. असे असतानाही मंदीरे उघडली नाही तर मंदीरांचे ताळे तोडू अशी आक्रस्ताळी भाषा वारकऱ्यांची नाही. टाळे तोडणे हे दरोडेखोरांचे काम आहे. आम्ही टाळ वाजवू, टाळे तोडणार नाही. शांत, संयमी अशी वारकऱ्यांची प्रतिमा आहे तिला तडा जावू नये ही काळजी सर्व समाज घटकांनी घ्यायला हवी.
