मोहन जोशी यांच्या हस्ते सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत १९४ ‘सुकन्या समृद्धी’ कार्डचे वाटप
पुणे : “मुलीला चांगले शिक्षण, आरोग्य मिळावे, तिला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी सुकन्या समृद्धी योजनेचा पालकांनी लाभ घ्यावा. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. महागाई, खर्चिक शिक्षण यामुळे पालक ट्रस्ट आहेत. अशावेळी पुष्कर प्रसाद आबनावे यांनी पुढाकार घेत मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना त्यांच्यापर्यंत नेऊन दिलासा दिला आहे,” असे मत माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १७व्या सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत महर्षीनगर येथील मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी परिसरातील दहा वर्षापर्यंत वयोगटातील मुलींसाठी भारतीय डाक-जीपीओद्वारे निर्माण केलेल्या सुकन्या समृद्धी योजना कार्डचे वाटप जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी वरिष्ठ डाकपाल बी. पी. एरंडे, महर्षीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शांताराम बापू, संयोजक पुष्कर प्रसाद आबनावे उपस्थित होते.
बी. पी. एरंडे म्हणाले, “आजच्या वर्तमानातील गुंतवणूकीवर मुलींचे उद्याचे उज्वल भविष्य अवलंबून आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी वाव आहे. पुष्कर आबनावे यांनी पुढाकार घेऊन १९४ मुलींच्या भविष्याची तरतूद केली आहे. अतिशय नियोजनबद्ध आणि व्यापक स्वरूपात आबनावे यांनी ही योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.”
‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा मूलमंत्र प्रत्येकाने जपला पाहिजे. १९४ मुलींना या कार्डचे वाटप करताना विशेष आनंद होत आहे. समाजामध्ये जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले अशा रणरागिणी निर्माण करायच्या असतील, तर आपल्या मुलींमध्ये विचारांची आणि सक्षमीकरणाची बीजे पेरणे गरजेचे आहे, असे पुष्कर आबनावे म्हणाले.