डॉ. कल्याण गंगवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती; मांसाहाराला त्यागण्याचे आवाहन
पुणे : शाकाहार सर्वोत्तम व आरोग्यदायी आहे. निरोगी जीवनासाठी शाकाहाराचा अंगीकार करून मांसाहाराचा पूर्णतः त्याग करावा, तसेच प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार द्यावा, असे आवाहन सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल पत्रकार परिषदेत केले.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “साधू वासवानी यांचा जन्मदिवस १९८६ पासून २५ नोव्हेंबर हा दिवस ‘मीट्लेस डे’ अर्थात विश्व शाकाहार दिवस व प्राणी हक्क दिवस म्हणून साजरा होत आहे. या दिवसाची संकल्पना ‘स्टॉप ऑल किलिंग’ अशी आहे. शाकाहाराचा आणि अहिंसेचा संदेश देण्याचा दिवस म्हणून याचे महत्व आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वानी शाकाहार अंगीकारून मांसाहार त्याग करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करतो.”
“शाकाहाराची चळवळ व्यापक होत आहे. कोरोना नंतर अनेक देशांनी शाकाहाराकडे वळण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये १५ टक्के लोकांनी शाकाहाराचा अंगीकार केला आहे. आरोग्यासाठी शाकाहाराचे महत्व लोकांच्या लक्षात येत आहे. हृदयरोग व कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांना मांसाहार कारणीभूत असल्याचे विश्वमान्य झाले आहे. त्यामुळे मानवी व पृथ्वीचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शाकाहार गरजेचा आहे. न्यूझीलंड, जर्मनी, डेन्मार्क व अन्य अनेक देशांत शाकाहार चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. जर्मनीमध्ये शाही भोजन शाकाहारी असते, तर ऍमस्टरडॅममध्ये मांसाहाराची जाहिरात निषिद्ध आहे. पर्यावरण संवर्धन व ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी देखील शाकाहार महत्वाचा आहे.”