डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; कृष्णकुमार गोयल, डॉ. विजय ताम्हाणे यांना ‘बंधुता भूषण पुरस्कार’ प्रदान

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; कृष्णकुमार गोयल, डॉ. विजय ताम्हाणे यांना ‘बंधुता भूषण पुरस्कार’ प्रदान

लोकशाहीच्या संरक्षणासाठी बंधुतेची पेरणी करणे गरजेचे
डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; कृष्णकुमार गोयल, डॉ. विजय ताम्हाणे यांना ‘बंधुता भूषण पुरस्कार’ प्रदान
 
पुणे : “राजकारणाचे व्यापारीकरण झाले असून, भारतीय लोकशाही, संविधानावर आघात होत आहेत. अशावेळी समाजाला एकसंध ठेवणारा बंधुतेचा विचार समाजमनात पेरण्याची गरज आहे. बंधुतेची पालखी आपल्या खांद्यावर समर्थपणे घेऊन विवेकाची पेरणी करणाऱ्या बंधुता परिषद सारख्या संस्था लोकशाहीचे संरक्षण करतील,” असे मत माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एस. एम. जोशी सभागृहात बंधुता दिन व पाचवा बंधुता काव्य महोत्सव साजरा करण्यात आला.
 
ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बंधुता काव्य महोत्सवाच्या समारोपावेळी डॉ. सबनीस यांच्या हस्ते उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार गोयल, दंतचिकित्सक डॉ. विजय ताम्हाणे यांना ‘बंधुता भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एस. एम. जोशी फाउंडेशनचे व्यवस्थापक राहुल भोसले यांना ‘निष्ठावंत कार्यकर्ता’ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्राचार्य संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

जयराम धोंगडे, सीमा खंडागळे, बाळासाहेब देवकर, सुनिता कपाळे, नंदकिशोर ठोंबरे, जयश्री रोहनकर, प्रकाश फर्डे, पौर्णिमा कुंभारकर, ज्ञानेश्वर काळे, कविता काळे यांना ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “महापुरुषांची, समाज शहाणपणाची बेरीज महत्वाची आहे. जातीधर्माच्या नावाखाली समाज फोडू पाहण्याच्या अनेक घटना घडताना आपण पाहतो. अशावेळी सर्वांना जोडणारा बंधुतेचा धागा विणला पाहिजे. जातीअंताचा विचार लोकशाहीला तारक आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा आहे. बंधुतेचा ध्यास घेऊन काम करणारे प्रकाश रोकडे अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहेत.”

प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेचा ध्यास घेऊन गेली अनेक दशकांपासून काम करत आहे. चांगल्या कामासाठी सहकार्य करणारे अनेक लोक या प्रवासात भेटत गेले. वैचारिक वाद, मनभेदाची स्पर्धा यापासून दूर राहिल्याने बंधुतेची दमदार वैचारिक फळी निर्माण करु शकलो, याचा विशेष आनंद आहे.”

कृष्णकुमार गोयल म्हणाले, “सकारात्मक विचार जगण्याची प्रेरणा देतात. ध्येयवादी सामान्य विचार समोर ठेवून प्रमाणिक निष्ठेने काम केले तर यश हमखास मिळते. प्रत्येक क्षेत्रात सामाजिक दायित्वाच्या भावनेतून योगदान देता येतेय, याचा आनंद वाटतो. केलेल्या कामाची पावती म्हणून मिळालेला हा पुरस्कार उर्जा देणारा आहे.”

समाजातील चांगल्या विचारांची माणसे शोधून त्यांना समाजापुढे आणण्याचे काम बंधुता परिषद करत आहे. चांगले नागरिक घडविण्यासाठी बंधुतेचा विचार मनात रुजणे गरजेचे आहे, असे डॉ. विजय ताम्हाणे म्हणाले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय गायकवाड यांनी आभार मानले.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *