कायदा सुव्यवस्था आणि बेपत्ता मुलींच्या प्रकरणांवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचा भर
धाराशिव, ता. 4 – धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भूकंपग्रस्त भागातील पुनर्वसन व सामाजिक वनीकरणाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यांनी स्वच्छतागृहांची तपासणी करावी तसेच पुनर्वसनासाठी नेमक्या केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच धाराशिवमधील शाळांना ‘स्मृतीवन’ संकल्पना समजावून घेण्याचेही त्यांनी सूचित केले.
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन
उन्हाळ्यात धाराशिव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असून, याबाबत उपाययोजना व मूल्यांकन झाले आहे का, याचा आढावा घेण्याचे निर्देश उपसभापतींनी दिले.
धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तसेच अमली पदार्थविरोधी उपाययोजनांच्या अंमलबजावणी बाबत विशेष धोरण आखण्याचे सुचित केले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी मोहिमेला गती देण्याच्या सूचना दिल्या आणि यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले.
ऊसतोड महिला कामगार आणि एकल महिलांचे सर्वेक्षण
ऊसतोड कामगार महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच, एकल महिलांबरोबरच त्यांच्या लहान मुलांसाठी सुरक्षा व्यवस्था किंवा शेड मोठ्या प्रमाणावर उभे करण्याबाबत सांगितले.
बालविवाह निर्मूलन व जनजागृती
बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती होणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने समाजसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
पॉक्सो प्रकरणातील मुलींना योजनांची माहिती
पॉक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांतील पीडित मुलींना महिलाविषयक योजनांची माहिती मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. या मुलींचे पुनर्वसन व सशक्तीकरण यावर अधिक भर देण्याचे त्यांनी सुचवले.
धाराशिवमधील बेपत्ता मुलींबाबत माहिती घेतली
धाराशिव जिल्ह्यातील बेपत्ता मुलींबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली व त्यासंबंधित तपास वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीत जिल्हाधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.