सद्यस्थितीत गांधी विचार पथदर्शी
डॉ. कुमार सप्तर्षी; ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना
गांधीवादी डॉ. कुमार सप्तर्षींचे कार्य प्रेरणादायी
डॉ. संप्रसाद विनोद; ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना
मानवजातीच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धन आवश्यक
डॉ. कुमार सप्तर्षी; ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’तर्फे ‘गांधीयन फिलॉसॉफी अवार्ड’
पुणे : “आज देशात कलुषित वातावरण बनले आहे. प्राकृतिक आणि मानसिक आरोग्य गंभीर होत चालले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना महामारी हे त्याचेच द्योतक आहे. आज निसर्गाने मानवाला विषाणू संसर्गाचा वाहक बनवले असून, मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या परिस्थितीला माणूसच कारणीभूत आहे. त्यामुळे मानवजातीच्या रक्षणासाठी सद्यस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि गांधी विचारांचे आचरण आवश्यक आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी नेते, विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली. या फाउंडेशनच्या माध्यमातून दिला जाणारा पहिला ‘सूर्यदत्ता गांधीयन फिलॉसॉफी अवार्ड २०२०’ डॉ. कुमार सप्तर्षी यांना योगाचार्य डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार सोहळा डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या कर्वेनगर निवासस्थानी सोशल डिस्टनसिंग आणि इतर नियमाचे पालन करून झाला. प्रसंगी डॉ. उर्मिला सप्तर्षी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, सल्लागार सचिन इटकर, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. अक्षित कुशल, प्रा. रेणुका घोसपुरकर, सिद्धांत चोरडिया, सेवासदनच्या सीमा दाबके आदी उपस्थित होते.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, “गांधींना प्रत्यक्षात पाहता आले नाही. परंतु, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, बाळासाहेब भारदे अशा गुरूंकडून गांधीविचार आत्मसात केला आणि जगलो. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करून आत्मनिर्भर भारत करण्याचा संकल्प महात्मा गांधींनी केला होता. म्हणूनच त्यांनी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला होता. मात्र, आज त्याचा उलट अर्थ घेतला जात आहे. आजही विषमता, अस्पृश्यता, लाचारी अशा गंभीर समस्या आपली पाठ सोडत नाहीत. अशावेळी गांधीविचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याची आणि तो प्रत्यक्षात आणण्याची आवश्यकता आहे. सज्जनांची संख्या वाढवून दुर्जनाची संख्या कमी करायला हवी. गांधींनी सुरु केलेले निसर्गोपचार आजच्या काळातही उपयुक्त ठरत आहेत. अणुबॉम्बसारख्या विनाशकारी निर्मितीवर गांधी विचारांचा उतारा अधिक प्रभावी आहे.”
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता शिक्षण संस्थेने गांधी विचारांना आदर्श मानत गेली दोन दशके कार्य उभारले आहे. आमच्या विद्यार्थी-शिक्षकांमध्ये हे विचार रुजावेत, यासाठी प्रयत्नशील आहोत. गतवर्षी गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्ताच्या विद्यार्थ्यांनी खास खादीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे प्रदर्शन भरवले. खादी संकल्पनेवर फॅशन शो केला. गांधी विचारांतून आणखी प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच हे विचार जगणाऱ्यांचा सन्मान करावा, या उद्देशाने ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना केली आहे.”
डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, “स्वओळख झालेले आणि वैचारिक पातळी, अधिष्ठान असलेले असे डॉ. कुमार सप्तर्षी आहेत. त्यांचे कार्य आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आताच्या परिस्थितीत युवापिढीला गांधी विचार पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवायला हवेत. कारण, युवकांमध्ये गांधी विचार रुजले तर देशाच्या जडणघडणीला आकार येईल. या पिढीला दिशा देण्याचे डॉ. सप्तर्षी यांच्यासारख्या गांधीवादी लोकांनी करावे.” डॉ. उर्मिला सप्तर्षी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिन इटकर यांनी आभार मानले.