डॉ. अरगडेंच्या अष्टपैलूत्वाने चाकणवासीयांना केले समृद्ध

डॉ. अरगडेंच्या अष्टपैलूत्वाने चाकणवासीयांना केले समृद्ध

डॉ.अरगडेंच्या अष्टपैलूत्वाने चाकणवासीयांना केले समृद्ध

डॉ. सदानंद मोरे यांचे गौरवोद्गार; सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश अरगडे यांचा जाहीर नागरी सत्कार

डॉ. अविनाश अरगडे यांच्या पाच दशकांच्या कारकिर्दीचा गौरव करणाऱ्या ‘चक्रयोगी’ ग्रंथाचे प्रकाशन

पुणे : “चाकणच्या ऐतिहासिक भूमीत स्थिरावत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य खर्ची घालत डॉ. अविनाश अरगडे यांनी लोकांच्या मनात घर केले. वैद्यकीय सेवेसह शिक्षण, क्रीडा, पाणी, पर्यावरण, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या अष्टपैलू कार्याने चाकणवासीयांना समृद्ध केले. संस्थात्मक कार्यातून त्यांनी आदर्श समाजाचे चित्र रंगवत समाजमन व पिढ्या घडविण्याचे काम केले,” असे गौरवोद्गार संत साहित्याचे अभ्यासक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी काढले. या कार्यात डॉ. अरगडे यांनी लोकांना जोडून घेत आपलेसे केल्याने त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग खूप मोठा असल्याचे नमूद केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश आरगडे यांच्या नागरी सत्कार व त्यांच्या साडेचार दशकांच्या कारकीर्दीवरील ‘चक्रयोगी’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे बोलत होते.  वैद्यकीय व्यवसाय करतानाच चाकण स्पोर्ट्स असोसिएशन, चाकण डॉक्टर असोसिएशन, चाकण शिक्षण मंडळ, चाकण कला व वाणिज्य महाविद्यालय, रोटरी क्लब ऑफ चाकण, चाकण पाणी प्रश्न चळवळ, अभिजात ललित कला मंच, नवोन्मेष विद्यामंदिर, ग्रामीण विज्ञान परिषद, इंग्लिश अकादमी, शेठ धनराज सांकला व्याख्यानमाला अशा विविध संस्थांच्या माध्यमातून डॉ. अरगडे यांनी गेल्या ४६ वर्षात भरीव योगदान दिले आहे. त्यानिमित्त त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

प्रसंगी राज्याच्या नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार डॉ. राम कांडगे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई मोहिते, डॉ. आरगडे यांच्या पत्नी आसावरी, पुत्र डॉ. असीत आरगडे, स्नुषा सुप्रिया अरगडे, काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जमीर काझी, माजी उपनगराध्यक्ष ऍड. प्रकाश गोरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, शिवसेनेचे रामदास धनवटे, चाकण शिक्षण मंडळाचे संस्थापक विश्वस्त मोती काका सांकला, माजी प्राचार्य राजू दीक्षित आदी उपस्थित होते.

हा सोहळा अनपेक्षित आणि आपल्या आयुष्यातील भावनिक क्षण असल्याची भावना व्यक्त करत डॉ. अविनाश अरगडे म्हणाले, “या प्रवासात अनेक चढउतार आले. परंतु, पत्नी आसावरीची खंबीर साथ आणि दृढनिश्चयाने केलेले काम यामुळे यश आले. बालपण कष्टात गेले; पण वडिलांचे संस्कार माझ्या घडणीत मोलाचे ठरले. स्वाभिमानी जगण्याची सवय त्यांनी लावली. कुठेही न झुकता, लालसेला बळी न पडता हाती घेतलेले काम नेटाने पुढे नेले. सामाजिक कामासाठी वेळ द्यावा लागतो, हे नव्या पिढीने लक्षात घ्यावे.”

डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले, “सामाजिक कामाने चाकणवासीयांच्या हृदयात स्थान मिळवूनही अरगडे यांना कधीही राजकीय मोह झाला नाही. निःस्वार्थ भावनेने नागरिकांचा विकास करण्याचे एकाच ध्येय त्यांच्यासमोर होते. लोकांचा सहभाग वाढवून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. ग्रामीण भागांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला. सर्वसमावेशक समाजकार्य कसे असावे, याचा वस्तुपाठ म्हणजे डॉ. अरगडे यांची कारकीर्द आहे.”

डॉ. राम कांडगे म्हणाले, “चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी डॉ. आरगडे यांनी काम केले. शासकीय नोकरीमुळे मर्यादा येत असल्याने एके दिवशी मीच राजीनामा देण्याचा सल्ला दिला आणि ते पुढे चाकणवासी झाले. संपूर्ण आरगडे कुटुंबाने सामाजिक बांधिलकीची भावना जपली. नम्रता, निष्ठा, सातत्य, पारदर्शीपणा आणि माणुसकीची भावना यामुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात. तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेऊन काम करावे.”

दिलीप मोहिते म्हणाले, “डॉक्टर असलेले अरगडे हे चिकित्सक असून, ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. चुकांवर पांघरूण न घालता परखडपणे सांगायची त्यांची सवय सर्वांसाठी दिशादर्शक आहे. परिणामांची पर्वा न करता चांगल्या माणसांचा पाठीमागे उभा राहायला हवे. चाकणच्या विकासात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असतानाही त्यांना कधीही राजकीय वा सत्तेच्या पदाची इच्छा झाली नाही.” 

सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले. राजू दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. कालिदास वाडेकर यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *