हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय,समर्पण भाव या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा
प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांचे प्रतिपादन; कुणाल कपूर, सुरेश पिल्लई यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’
पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम (एससीएचएमटीटी) आणि सूर्यदत्त स्कूल ऑफ इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट (एसएसआयएचएम) यांच्यातर्फे प्रख्यात सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व सुरेश पिल्लई यांना पाककला कला व आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष आणि स्वेला च्या अध्यक्ष सुषमा चोरडिया, सूर्यदत्तचे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, मेरिट अवॉर्ड्स आणि मार्केटच्या सहसंस्थापक जिया पनवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”कोणत्याही क्षेत्रातील हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पण हा त्रिसूत्री मंत्र आहे. त्याचे आचरण करत, आधार घेत ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायला हवी. शेफ कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई यांच्या प्रवासातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी.’सूर्यदत्त’ने नेहमीच समाजातील उत्कृष्टतेचा सन्मान केला आहे. उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करतानाच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश यामागे असतो. पाककला आणि आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई आदर्श आहेत.”
प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, परफॉर्मिंग आर्ट्स, भारतीय चित्रपट, क्रीडा, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, शिक्षण यासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांना याआधी सन्मानित करण्यात आले आहे. पाककला व आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रात चीनचे शेफ एम ऍंथोनी, इंडोनेशियाच्या श्रीमती नीता दुलाराम, भारताचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, शेफ विष्णू मनोहर, शेफ डॉ. आद्यशा दास यांचा समावेश आहे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
या गौरवाबद्दल आनंद व्यक्त करत कुणाल कपूर म्हणाले,”हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद शब्दात व्यक्त कारण कठीण आहे. आजवर केलेल्या कामाची पोचपावतीच नव्हे तर, येत्या काळात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे. बंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि जर्मन चॅन्सलर सुश्री मर्केल यांच्यासाठी सात्विक पाककृती करण्याची संधीमिळाली. भारतआफ्रिका शिखर परिषदेत ४२ प्रथम महिलांसाठी स्वयंपाक केला. त्यांच्या भारत भेटीदरम्यान पाककला सत्र केले. एनडीटीवी गुड टाईम्स, पिकल नेशनवरील ‘माय यलो टेबल’, मास्टरशेफ इंडिया आणि ज्युनियर मास्टरशेफ इंडियासारखे टेलिव्हिजन शो होस्ट केलेआहेत. मास्टरशेफ अमेरिकेच्या सेमीफायनलला शेफ गॉर्डन रॅम्सेसोबत आमंत्रित करण्यात आले होते. वीर संघवी यांनी ‘मास्टरशेफ इंडियाचा खरा स्टार’ म्हणून गौरवले.”
सुरेश पिल्लई म्हणाले,”या पुरस्कारासाठी ‘सूर्यदत्त’चे मनापासून आभार मानतो. हा क्षण माझ्यासाठी अभिनामाचा क्षण असून, या पुरस्काराचे सर्व श्रेय माझ्या मार्गदर्शकांना आणि सहकाऱ्यांना जाते. या सर्वांना माझा पुरस्कार समर्पित करतो. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा मी मुलगाआहे. यशस्वी होण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा आहे असलेल्या लोकांना नोकरी देऊन मला समाजऋण फेडायचे आहे. मी पदवीधर किंवा पात्र शेफ नव्हतो. एक वेटर म्हणून सुरुवात केल्याने अनेक धक्क्यांमधून जावे लागले. पाककलेचा प्रवास मला इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅरिबियन येथे घेऊन गेला. २०२१ मध्ये बंगळुरूमध्ये यशस्वी रेस्टॉरंट शेफ पिल्लई (आरसीपी) लाँच केले. कोचीच्या लेमेरिडियन हॉटेलमध्ये दुसरे रेस्टॉरंट सुरू केले. लवकरच, दुबई आणि दोहामध्ये रेस्टॉरंट्स सुरु होणार आहेत.